आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला महापालिकेत सत्ता संघर्ष; 26 कोटी अन् आकडा 36 चा, राजकारण तापले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शहर विकासासाठी आलेला 26 कोटींचा निधी खर्चाच्या मुद्दय़ावरून भारिप-बमसं, काँग्रेस हे एकमेकांसमोर आले आहेत. भारिप-बमसंने काँग्रेस पदाधिकार्‍यांवर आरोप करीत काँग्रेसमुळे विकास खुंटल्याचे सांगितले. या मुद्दय़ावरून महाआघाडीतील सत्तापक्षात मात्र 36 चा आकडा निर्माण झाला आहे.

भारिप-बमसंचे आरोप काँग्रेसला अमान्य आहेत. भारिप बमसंने आज काँग्रेसवर आरोप करीत विकासकामात व्यत्यय आणल्याने सत्ता सोडण्याची तयारी दर्शविली होती. काँग्रेस नेत्यांनी हे आरोप गंभीरतेने घेत त्याविरुद्ध प्रतिक्रिया देताना भारिपच्या समन्वयकाची भूमिका योग्य नसल्याचा आरोप केला.

कृतीतून विकास करा
काँग्रेसचा मान राखला जातो. उपमहापौरांनी या निधीचा ठराव मंजुर करावा. कृतीतून विकास कामांना प्राधान्य द्यावे. शहर विकासाचे कामे त्वरीत करावी.
- प्रा.धैर्यवर्धन पुंडकर, समन्वयक,भारिप

काँग्रेसचा सन्मान राखा
कामांचे नियोजन करताना काँग्रेसचा सन्मान राखला पाहिजे. भारिपचे समन्वयक सन्मान राखत नसल्याने वाद आहे. ते सोडवले जावू शकतात. काँग्रेसने या निधीबाबत खोडा घातला नाही.
- रफिक सिद्दीकी उपमहापौर, मनपा.

आंदोलन केल्याने महाआघाडीत पडली ठिणगी
26 कोटींच्या निधीतून विरोधातील भाजप नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामांसाठी कमी निधी द्यावा, अशी सत्तारूढ पक्षाची भूमिका होती. यातून वाचणारा निधी काँग्रेस या महाआघाडीच्या पक्षाकडे वळता करावा, ही मागणी होती. पण, या वादात तो निधीच अखर्चीत आहे. निधी अखर्चीत राहिल्याने शहराची स्थिती भकास झाली व स्वपक्षीय नेत्यांनीच रस्त्यावर आंदोलन केल्याने महाआघाडीतील ठिणगी पडली.

26 कोटींचा प्रवास
राज्य शासनाने 26 कोटी मार्चमध्ये महापालिकेतील विकास कामांच्या खर्चासाठी पाठविले होते. त्यानंतर यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अमरावती येथील विभागीय आयुक्तांकडे जात हा निधी समान पद्धतीने खर्चाची मागणी केली. तर, यावर मुंबईत सत्तारुढ पक्षाची बैठक झाली. येथे महापालिकेत यावर अनेकदा चर्चा झाली आता हाच निधी येथील सत्ता परिवर्तनाची नांदी ठरू शकतो.