आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Akola Administration Has Aape, Compressor, Container Decided To Buy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कचरा संकलनासाठी प्रशासनाचा पुढाकार, अॅपेसह कचरा घंटागाडी खरेदी करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- संपूर्ण शहर कचरामुक्त राहावे तसेच कचरा संकलनाचे काम योग्यरीत्या व्हावे, यासाठी प्रशासनाने १३ वित्त आयोगाच्या निधीतून अॅपे, कचरा घंटागाड्या, कॉम्प्रेसर, कन्टेनर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाला यापूर्वीच महासभेने मंजुरी दिली आहे. आतापर्यंत १३ अॅपे सेवेत दाखल झाले असून, उर्वरित वाहने लवकरच सेवेत दाखल होणार आहेत.
शहर स्वच्छतेसाठी विविध प्रयत्न प्रशासनाकडून होत आहेत. ओल्या कचऱ्यातून बायोगॅस निर्मितीत नागरिकांनी पुढाकार घ्यावा, यासाठी प्रशासनाने कार्यशाळेचे आयोजनही केले होते. याच बरोबर कचरा उचलण्याचे कंत्राट झोननिहाय देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे बाजारातील कचरा उचलण्यासाठी वेगळ्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. या सर्व बाबींमुळे शहरात अधिकाधिक स्वच्छता राहावी, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे कचरा संकलनासाठी विविध वाहने खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
यापूर्वी संपूर्ण शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट एकाच संस्थेला देण्यात आले होते. यात बाजाराचाही समावेश होता. त्यामुळे एकाच वेळी अनेक प्रभागांतून कचरा उचलण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर एकाच वेळी िवविध भागातील तक्रारींचा निपटारा करताना कंत्राटदाराला तसेच प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. तसेच कचरा संकलित करण्यासाठी कन्टेनरही नसल्याने नागरिक मोकळ्या जागेत कचरा टाकत असल्याने डोकेदुखी वाढली होती. ही बाब लक्षात घेऊनच प्रशासनाने ३५० कन्टेनर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २००३ मध्ये कन्टेनर खरेदी केले होते. हे कन्टेनर जीर्ण झाल्यानंतर नवीन कन्टेनर खरेदी केले नव्हते.
मात्र, आता ३५० कन्टेनर खरेदी केले जाणार असल्याने शहरात विविध ठिकाणी हे कन्टेनर ठेवून यात कचरा संकलन केले जाणार आहे. त्यामुळे मोकळ्या जागेत कचरा टाकण्याची गरज राहणार नाही. याच बरोबर गल्ली बोळात तसेच व्यावसायिकांकडून कचरा संकलनासाठी ३६ अॅपे खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. यापैकी १३ अॅपे वाहन सेवेत दाखल झाले आहेत. याच बरोबर १५० कचरा घंटागाड्याही खरेदी केल्या जाणार आहेत. ही सर्व वाहने येत्या काही दिवसांत महापालिकेच्या सेेवेत दाखल होणार असल्याने स्वच्छता राखण्यास मदत मिळणार आहे.
अशी खरेदी केली जाणार वाहने
३५० कन्टेनर
३६ अॅपे
१५० कचरा घंटागाडी
३१ मे ला उघडणार निविदा
प्रशासनाने झोननिहाय कचरा उचलण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. तसेच बाजारातील कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. या निविदा ३१ मे रोजी उघडणार आहेत. निविदांना प्रतिसाद मिळाल्यास पुढील महिन्यात झोननिहाय कचरा उचलण्याचे काम शहरात सुरू होईल. त्यामुळे शहर अधिक प्रमाणात स्वच्छ राहण्यास मदत मिळणार आहे.
नागरिकांचे सहकार्य
- प्रशासन स्वच्छता राखण्यासाठी विविध उपाययोजना आखत आहे. परंतु, नागरिकांचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. नागरिकांनी दररोज निघणारा कचरा रस्त्यावर टाकता, तो संकलित करून कचराकुंडीतच टाकावा तसेच घंटागाडी सुरू झाल्यानंतर महापालिकेला सहकार्य करावे.''
सोमनाथ शेटे, आयुक्त महापालिका