आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला विमानतळाचा अडथळा दूर होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/अकोला - शिवणी विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी मुख्य अडथळा ठरत असलेल्या शरद सरोवराला दुसर्‍या जागेत स्थानांतरित करून शिवणी विमानतळाचा प्रश्‍न एका महिन्यात निकाली काढण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (25 जुलै)ला विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली. आमदार गोपीकिशन बाजोरिया व आमदार डॉ. रणजित पाटील यांनी 93 अन्वये उपस्थित केलेल्या सूचनेवर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी कृषी विद्यापीठाला विमानतळासाठी जमीन द्यावीच लागणार असल्याचे स्पष्ट केले.

विमानतळावर एटीआर 72 या प्रकारचे विमान उतरण्यासाठी 1,800 मीटरच्या लांबीच्या धावपट्टीची आवश्यकता आहे. सध्या शिवणी विमानतळाची धावपट्टी 1,400 मीटर असून, त्या धावपट्टीच्या विस्ताराचा निर्णय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. वारंवार हा प्रश्‍न विधिमंडळात उपस्थित करण्यात आला आहे. आज पुन्हा या प्रश्‍नावर विधिमंडळात जोरदार चर्चा झाली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी शिवणी विमानतळासाठी अकोला जिल्हाधिकार्‍यांनी पाठवलेल्या प्रस्तावात 79.21 हेक्टर जमिनीचा समावेश असल्याचे सांगितले. त्यांपैकी 25.06 हेक्टर खासगी जमीन असून, 54.15 हेक्टर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जमीन आहे. कृषी विद्यापीठाने 22 जानेवारी 2013 रोजी घेतलेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत विद्यापीठाची शरद सरोवर व इतर जमीन विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे निकामी होत असल्याने विद्यापीठाच्या जमिनीऐवजी महामार्ग विभागाच्या 75 हेक्टर जमिनीचा विचार शासनाने करावा, असा ठराव पारित केला; परंतु, भारतीय विमान प्राधिकरणाने महामार्ग विभागाची जमीन तांत्रिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे स्पष्ट केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कृषी विद्यापीठाने शरद सरोवराचा वापर सिंचनासाठी होत असल्याने ती जमीन देण्यास वारंवार नकार दिला. त्यामुळे अकोला उपविभागीय अधिकार्‍यांनी 15 मार्च 2013 रोजी शरद सरोवराची पाहणी केली. त्या वेळी शरद सरोवर हे 75 बाय 75 मी. असून, त्याची खोली 2.50 मी. आहे. या सरोवरामध्ये नैसर्गिकरित्या पाणीसाठा होत नसल्यामुळे 5 कि. मी. अंतरावरून पंपाद्वारे पाइपलाइनद्वारे पाण्याचा साठा करण्यात येतो. हे सरोवर नसून, मोठे शेततळे असल्याचे दिसून येते. या सरोवराचा उपयोग सिंचनासाठी होत नसल्याचेसुद्धा आढळून आल्याचे उपविभागीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध अन्य जागेवर सरोवर स्थलांतरित करून विमानतळाचा मार्ग मोकळा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


खासगी जमिनीचा प्रश्‍न मध्यस्थीने निकाली काढू
शिवणी विमानतळासाठी 25.06 हेक्टर खासगी जमीन आवश्यक आहे. त्या जमिनीमधील एक जमीनधारक मधुसूदन नंद यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर पुढील आदेशापर्यंत तिसर्‍या पक्षाचे हक्क निर्माण करू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी मध्यस्थी करून हा प्रश्‍न निकाली काढू, अशी माहिती आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.