आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळ धावपट्टीचे महसूल, विमानतळ प्राधिकरणाकडन मोजमाप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकगुड न्यूज । महसूल, विमानतळ प्राधिकरण अधिकार्‍यांनी केली पाहणीअकोला - शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या शिवणी विमानतळाची धावपट्टी विस्तारीकरणासाठी मोजण्यात आली. सोमवारी करण्यात आलेल्या या मोजणीत महसूल, विमानतळ प्राधिकरण, भूमी अभिलेख व कृषी विद्यापीठाचे अधिकारी संयुक्तपणे सहभागी होते.

शिवणी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त जागा लागणार आहे. तूर्तास या विमानतळाची धावपट्टी सुमारे 1400 मीटर लांब आहे. धावपट्टी सुमारे 1800 मीटर किंवा 2100 मीटर करण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठ व खासगी लोकांची जमीन या विस्तारीकरणात लागणार आहे. विस्तारासाठी सर्वाधिक जमीन ही कृषी विद्यापीठाची लागेल.

सोमवारी केलेल्या पाहणीत सुमारे 1800 मीटर लांब धावपट्टीसाठी कृषी विद्यापीठाची सुमारे 52 हेक्टर जमीन ताब्यात घ्यावी लागणार आहे. यात कृषी विद्यापीठातील शरद सरोवर व कृषी पर्यटन केंद्राचा समावेश आहे. धावपट्टी विस्तारीकरणासाठी कृषी विद्यापीठाची ही जमीन आवश्यक असून, त्या व्यतिरिक्त सुमारे 34 हेक्टर खासगी जमिनीची आवश्यकता आहे. अशी एकूण 86 हेक्टर जमीन विस्तारीकरणासाठी लागणार आहे. धावपट्टी व विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या खासगी जमिनीचे एकही प्रकरण न्यायप्रविष्ट नसल्याची माहिती प्रभारी उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांनी दिली. या वेळी विमानतळ प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अभिजित जगन्नाथ, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक लालसिंग मिसाळ, कृषी विद्यापीठातील बांधकाम विभागाचे अभियंता, मंडळ अधिकारी व तलाठी यांची उपस्थिती होती.

विस्तारीकरण कुठे
सध्या अस्तित्वात असलेल्या विमानतळाच्या उत्तर व पश्चिम बाजूला विस्तार करावा लागणार आहे तसेच विस्तारीकरणात विमानतळ प्राधिकरणाची कर्मचारी वसाहतदेखील बाधित होणार आहे. विमानतळाच्या दक्षिण बाजूस हा विस्तार होणार आहे. त्यामुळे केवळ विद्यापीठाची जमीन लागणार नसून, खासगी लोकांची व विमानतळ प्राधिकरणाची जमीन विस्तारीकरणासाठी लागेल. सुमारे 1800 मीटर लांब किंवा 2100 मीटर लांब धावपट्टी केल्यास लागणार आहे. पण, थेट 2100 मीटर नवी धावपट्टी निर्माण करण्याची गरज भासल्यास कृषी विद्यापीठाची सुमारे 286 हेक्टर पर्यायी जागा लागेल.

धावपट्टीच बदलली तर
सद्य:परिस्थितीत अस्तित्वात असलेल्या विमानतळाच्या बाजूला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जातो. त्याच्या विरुद्ध दिशेला कृषी विद्यापीठाची जमीन आहे. त्यामुळे विमानतळाच्या धावपट्टीची लांबी न वाढवता थेट संपूर्ण नवीन धावपट्टी तयार करणे शक्य आहे. पण, त्यामुळे विद्यमान 1400 मीटर लांब धावपट्टी ही निरुपयोगी ठरेल. अशा वेळी 2100 मीटर लांब धावपट्टी तयार करण्यासाठी काही कोटींचा खर्च होणार आहे. कृषी विद्यापीठातील पर्यायी जमिनीचा या नव्या धावपट्टीसाठी वापर करता येऊ शकतो.

किती विस्तार होणार?
शिवणी विमानतळावर सद्य:परिस्थितीत 1400 मीटर लांबीची धावपट्टी आहे. या धावपट्टीचा विस्तार हा 400 मीटरने केल्यास ती 1800 मीटर होते. पण, यापेक्षा अधिक विस्तार शक्य असल्याने व राज्य सरकारची तशी मनीषा असल्याने ही धावपट्टी 2100 मीटर लांबीची होऊ शकते. विस्तारीकरणात प्रशासकीय इमारतीला कुठलाही धक्का लागणार नाही. विस्तारीकरण 2100 मीटरपर्यंत झाले, तर विद्यापीठात असलेले होस्टेल बाधित होईल. शासनाला येथील विमानतळाचा नेमका किती विस्तार करायचा आहे, हे येत्या काळात स्पष्ट होईल.