आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयडियल होमप्रकरणी तिघांना शोकॉज नोटीस, महापालिकेचा 2009 मध्ये परवाना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महापालिकेचा 2009 मध्ये परवाना काढलेल्या पण, 2012-13 चा मालमत्ता कर भरणार्‍या आयडियल होम या मुलींच्या खासगी वसतिगृहातील प्रकरणात महापालिकेने तिघांना नोटीस बजावली. या प्रकरणात महापालिका कर अधीक्षक विजय पारतवार, सहायक कर अधीक्षक नंदकिशोर उजवणे (तूर्तास जुगारप्रकरणी निलंबित), कर वसुली लिपिक श्याम गाडेकर यांना ही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या तिघांनी 24 तासात खुलासा करावा, असा आदेश दिला आहे. तसेच या प्रकरणात महापालिकेचे नुकसान झाले असल्यास संबंधितांना निलंबित का करण्यात येऊ नये, अशा आशयाची ही नोटीस बजावली आहे.

रामनगरातील आयडियल होम (लोटस होस्टेल) या मुलींच्या खासगी होस्टेलच्या कर आकारणीत आयुक्त व कर विभागातील अधिकार्‍यांनी हात ओले केल्याचा आरोप भाजपच्या दोन नगरसेवकांनी केला होता. या प्रकरणात 36 लाख रुपयांची नोटीस महापालिकेने दिली होती. ही नोटीस गहाळ करत सुमारे 32 लाखांचे नुकसान झाल्याचा दावा अजय शर्मा व करुणा इंगळे या नगरसेवकांनी केला होता. हे प्रकरण काल महासभेतदेखील उचलण्यात आले होते. अखेर या प्रकरणात आज आयुक्तांनी सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश महापालिका कर विभागाचे प्रमुख जी.एम.पांडे यांना दिला. या आदेशानंतर तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

अनुत्तरित प्रश्न
परवाना दिल्यानंतर तब्बल चार वर्षांनी कर आकारणी कशी केली, याची चौकशी होण्याची गरज आहे. महापालिकेच्या आर्थिक नुकसानाची भरपाई कोण करेल, तीन मजली असलेल्या या आयडियल होमच्या चौथ्या मजल्यावरचे बांधकाम मोजणार की नाही. फ्लॅटची व एकूण एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक)ची पुनर्तपासणी होणे गरजेचे आहे. एफएसआयनुसार व्यावसायिक कराची आकारणी महापालिका करेल की कॉटप्रमाणे होईल, याचा खुलासा आवश्यक आहे. महापालिकेची संगनमताने केलेली फसवणूक पाहता अधिकारी व कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल होईल की नाही, असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.