आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे भय संपत नाही, भारिप-बमसंच्या नाराजीचा फटका,

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महापालिकेत शुक्रवारी स्मशान शांतता होती. सर्वच राजकीय पक्षांनी तोंडावर बोट ठेवले होते. महापौरांनी न दिलेल्या राजीनाम्यावर सर्वच ठिकाणी जोरदार चर्चा होती. या सर्व घडामोडीत सत्ता जाण्याची भीती काँग्रेसला वाटत असल्याचे चित्र दिसत होते. सत्तारूढ महाआघाडीच्या इतर मित्र पक्षांनी भारिप-बमसंची ही अंतर्गत बाब असल्याचे सांगत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

शहर विकासासाठी आलेल्या 26 कोटी रुपयांच्या निधीत खोडा निर्माण केल्याचा आरोप भारिप-बमसंचे गटनेते गजानन गवई यांनी काँग्रेसवर केला होता. वेळप्रसंगी सत्ता सोडण्याचा इशारा द्यायलाही ते विसरले नाहीत. त्यानंतर महापौरांच्या राजीनाम्याची कथित मागणी व नकार चर्चेत आला. भारिप-बमसंच्या या इशार्‍यामुळे सत्तारूढ महाआघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला धक्का बसला आहे. पण, त्यावर प्रतिक्रिया देण्याची तयारी काँग्रेस नेत्यांनी दाखवली नाही. महाआघाडीतील इतर घटक पक्षांनी याबाबत विचारमंथन सुरू केल्याची माहिती प्राप्त झाली. दरम्यान, रात्री महापालिकेतील घडामोडींवर काही नगरसेवकांनी एक गुप्त बैठक घेतल्याची माहिती मिळाली.

‘ते’ दोन ठराव कायम करा : रिलायन्स फोर-जी केबल टाकण्यासाठी दिलेली परवानगी रद्द करण्याचा व दोन कोटी रुपयांच्या कामांचा ठराव रद्द करण्याचा विषय महासभेत झाला होता. हा ठराव अमलात आणण्यासाठी आता प्रशासनावर दबाव वाढला आहे. त्यामुळे प्रशासन कोंडीत अडकले आहे.

वेळप्रसंगी योग्य निर्णय घेऊ
काँग्रेसला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. हा पाठिंबा कोणी गृहीत धरू नये. जनहितार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले आहे. ते यापुढेदेखील करण्यात येईल. महापालिकेतील सर्व राजकीय घडामोडींवर पक्षाचे लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस योग्यवेळी निर्णय घेईल. अजय तापडिया, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.

26 कोटी खर्च करा
काँग्रेसने सत्ता जाण्याची भीती मनात न बाळगता राज्य सरकारने पाठवलेला 26 कोटी रुपयांच्या विकासकामांचे नियोजन करावे तसेच या निधीतून विकासकामे हाती घ्यावी, जनतेला दिलासा द्यावा. प्रा. धैर्यवर्धन पुंडकर समन्वयक, भारिप-बमसं


भारिपची अंतर्गत बाब
महापौरांचा राजीनामा व सत्ता सोडण्याचा भारिप-बमसंचा इशारा ही पक्षाची अंतर्गत बाब आहे. महापालिकेतील सत्ता अस्थिर झाल्यास पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. काँग्रेस जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहणार आहे.
मदन भरगड, शहराध्यक्ष, काँग्रेस.

सरकारला कल्पना देऊ
येथील राजकीय परिस्थिती पाहता व 26 कोटी रुपये खर्च होत नसल्याचे पाहता या संबंधीची माहिती राज्य सरकारला कळवण्यात येईल. हा निधी प्राप्त झाल्यापासून तो तसाच पडून आहे. याबाबत शासनाला माहिती देण्यात येईल. तसे शासनाकडून मार्गदर्शन घेऊ.
दीपक चौधरी, आयुक्त, महापालिका.

स्थायी समितीचे गठन रखडले
मनपातील अस्थिर वातावरणामुळे स्थायी समितीच्या गठनाची आयुक्तांची सूचना मागे पडली आहे. उच्च न्यायालयाने निवृत्त आठ सदस्यांची निवड प्रक्रिया रद्द केल्याने या समितीत नव्याने आठ सदस्यांची निवडीची सूचना आयुक्तांनी केली होती. त्याची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे.