आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंखे बंद, एलसीडी लटकलेले डबे; अकोला बसस्थानक बनले समस्यांचे आगार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- अकोला मध्यवर्ती बसस्थानक सध्या समस्यांचे आगार बनले आहे. बसस्थानकावर सोयी-सुविधांचा अभाव व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. समस्यांचे हे बसस्थानक कधी ‘हायटेक’ होणार, या प्रतीक्षेत प्रवासी आहे. त्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

बसस्थानकावर मनोरंजनासाठी लावण्यात आलेला एलसीडी मागील काही दिवसांपासून बंद आहे. तसेच काही पंखे आणि पथदिवे देखील बंद आहेत. प्रवाशांच्या माहितीसाठी लावण्यात आलेले तिकीट दर फलकावर जाहिरातीचे फलक लावण्यात आले आहेत. येथे अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या अधिक आहे. बसस्थानकामध्ये अवैधरीत्या ऑटोधारकांचे वास्तव्य आहे. यासोबतच बसस्थानकाभोवती अवैध वाहनधारकचा वावर वाढत आहे. हे वाहनचालक प्रवाशांची पळवापळवी करत असल्यामुळे एसटीला महिन्याकाठी लाखोंचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून मध्यवर्ती बसस्थानकावरील रंगरंगोटीही करण्यात आलेली नाही. अनेक ठिकाणी बसस्थानकाचा काही भाग कोसळत आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. याला एसटी महामंडळाचा कारभार कारणीभूत असल्याचा आरोप प्रवासी करत आहे.

बसस्थानकात बर्‍याच ठिकाणी पाणी गळत आहे. ही गळती थांबविण्यासाठी त्वरीत प्रयत्न होणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी प्रवाशांना बसताना त्रास सहन करावा लागत आहे. शौच्छालयाची दैना आहे. बसस्थानकात काही ठिकाणी घाण साचली आहे. त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. नियमित साफसफाई अभियान राबवण्याची गरज आहे.

मध्यवर्ती बसस्थानकातून नियमित 293 बसेस जाणे-येणे करतात. 23 हजार किलोमीटर या बसेसचा दररोज प्रवास आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एकूण 600 कर्मचारी आहेत. यामध्ये वाहक आणि चालकांचा समावेश आहे. मध्यवर्ती बसस्थानकांवर फेरीवाले 10 ते 15 आहेत. हमाल 12 ते 15 आहेत. पोलिस दोन व महिला पोलिस कर्मचारी दोन आहे. तरीही प्रवाशांच्या दैनाच आहे. अशात प्रवाशांची पळवापळवी होत आहे. या सर्व प्रकाराला पूर्णपणे एसटी प्रशासनाचा कारभार कारणीभूत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

निधी मिळणार
नाशिक बसस्थानकांच्या धर्तीवर अकोला बसस्थानक होणार आहे. राज्य परिवहन महामंडळ विभागाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून निधी मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

व्यवस्थापकीय संचालकांकडून पाहणी
राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर हे राज्यातील प्रमुख बसस्थानकांची पाहणी करणार आहेत. यासोबतच अकोला विभागातील मध्यवर्ती बसस्थानकांची पाहणी करणार आहेत. अशात विभागीय नियंत्रक प्रशांत भुसारी हे दीर्घ रजेवर गेले आहेत.

सुविधा देण्यासाठी एसटी कटिबद्ध प्रवाशांना सोयी-सुविधा देण्यासाठी एसटी कटिबद्ध आहे. प्रवाशांना सोयी-सुविधा मिळाव्यात हाच एसटीचा प्रमुख उद्देश आहे.
-अरुण इंगळे, प्रभारी आगार व्यवस्थापक