आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोल्यात दिशानिहाय बसस्थानकांची गरज; मोठ्या शहरांच्या धर्तीवर मिळेल चालना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'शहरातून दररोज हजारो अवजड वाहने ये-जा करतात. यात सुमारे दोन हजारपेक्षा जास्त बसेसचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा झाले आहेत. मदनलाल धिंग्रा चौकात तर फारच वाईट परिस्थिती असते. जर मोठय़ा शहरांच्या धर्तीवर अकोल्यातील बसस्थानकाचे विभाजन करून मार्गनिहाय बसस्थानक निर्माण केल्या गेले, तर वाहतूक समस्या निकाली लागेल सोबतच अकोल्याच्या विकासाला नवी दिशाही मिळेल..'

अकोला- शहराचा विस्तार होत असून, येथील नागरिक विकासाची वाट पाहत आहे. वाहतुकीची कोंडी, अतिक्रमणांनी गजबजलेले अरुंद रस्ते, वाहनांची गर्दी आणि हतबल वाहतूक पोलिस हे आपल्या अकोल्यातील रोजचे दृश्य झाले आहे. त्यात मदनलाल धिंग्रा चौक म्हणजे शहरातील हृदयस्थान. येथे दिवसभर सुमारे हजार बसेस, खासगी वाहने, उभ्या असलेल्या 200 ऑटो-सायकलरिक्षा, घाईने जाणारी दुचाकी वाहने आणि हजारो पादचारी, एकंदरीत गोंधळाचे दृश्य निर्माण करतात. प्रशासनात दूरदृष्टीची कमतरता आणि जनसामान्यांत सामाजिक अनुशासनाचा अभाव यासंदर्भात भीतीदायक दृश्य निर्माण करतो. पण अकोलेकरांना हवाय सुंदर आणि सुव्यवस्थित अकोला. पुणे, भोपाळ व इतर मोठय़ा शहरांच्या धर्तीवर जर वेगवेगळ्या बसस्थानकांची (स्प्लीट एसटी स्टँड) कल्पना अंमलात आणली तर अकोल्याचा चेहरामोहरा बदलायला सुरुवात होऊ शकेल. शिवाय सध्याचे बसस्थानक हलवल्यामुळे रिकाम्या जागेवर मोठे मॉल्स्, मल्टिप्लेक्स उभारून परिवहन महामंडळ मोठी आर्थिक तरतूद करू शकेल.

गेल्या 10 वर्षांत अकोला शहराची व्याप्ती वाढली आहे. शहर हळूहळू का होईना, विकासाच्या मार्गावर आहे. शहराच्या वाढत्या गरजेप्रमाणे शहरात काही ठळक बदल करण्याची गरज आहे. मदनलाल धिंग्रा चौकात वाहतुकीची मुख्य समस्या आहे. एसटी बसमुळे या चौकात अनेक अपघातही घडले आहेत. बसस्थानकावर दररोज एक हजार एक एसटी बसेस येतात. याशिवाय सुमारे 150 ऑटोरिक्षा व 70 सायकलरिक्षा परिसरात उभ्या असतात. खासगी वाहनांचाही बसस्थानकाला विळखा असतोच. या परिस्थितीमुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
11 कि.मी. मध्ये व्यापले शहर
अकोला शहर 11 कि. मी. अंतरामध्ये व्यापले आहे. शहराच्या हद्दवाढीचा प्रo्न प्रलंबित आहे. शहरात वाहतुकीची गंभीर समस्या आहे. त्यातच अवजड वाहनांची मोठय़ा प्रमाणात वाहतूक आहे. सर्व एसटी बस शहराबाहेरून गेल्यास वाहतुकीवरील भार हलका होईल. अपघातही टाळले जातील.

मिनिटाला दोन बस धिंग्रा चौकात
साधारणत: सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत बसफेर्‍या आहेत. या 15 तासांतील 900 मिनिटांमध्ये एक हजार एक बसेस (हजारो खासगी वाहनांच्या व्यतिरिक्त) बसस्थानकामध्ये प्रवेश करतात व बाहेर निघतात. एकवेळा आत जाणे व बाहेर निघणे. म्हणजे दोन हजार दोन एसटी एसची वाहतूक बसस्थानकावरून होते. त्यामुळे एका मिनिटाला सरासरी दोन बस वाहतुकीला अडथळा ठरतात. सकाळी 6 ते 12 व संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत सर्वाधिक बसेसची वर्दळ असते. या वेळेत मिनिटाला पाच बसेस ये-जा करत असतात.
बसस्थानकाच्या जागेवर उभारावे मॉल्स्, महामंडळाला मिळेल पैसा
सध्या अस्तित्वात असलेल्या बसस्थानकाच्या जागेवर मॉल्स् उभारले जाऊन शहराच्या विकासाला चालना देता येऊ शकते, असे अकोलेकरांचे मत आहे. शिवाय त्यापासून परिवहन महामंडळाला अतिरिक्त आर्थिक उत्पन्नही प्राप्त होईल. त्यानुसार विकास कार्य राबवता येईल.

जुन्या बसस्थानकावर शहर वाहतूक बसेसचे होऊ शकते स्थानक
अकोला शहरामध्ये सिटी बससाठी कुठलेही स्थानक नाही. मनपाच्या एएमटीच्या बसेस खुले नाट्य गृहात उभ्या राहतात. टॉवर चौकातील जुन्या बसस्थानकावर शहर बससेवेचे बसस्थानक होऊ शकते. शहराच्या मध्यवर्ती भागातून अकोलेकरांना संपूर्ण शहरात बससेवेची सुविधा उपलब्ध होईल. नवीन चार ठिकाणी निर्माण केलेल्या बसस्थानकांनाही शहर बस सेवेने जोडल्या जाऊ शकते.

प्रवाशांची सोय होईल
शहर बसस्थानकाचे विभाजन करून चार नवीन बसस्थानक निर्माण केल्यास प्रवाशांना सोय निर्माण होईल. ऑटोचालकांसाठी हा चांगला निर्णय राहील. बसस्थानक वाटून प्रवाशांना सुविधा देता येतील.
-नीलेश इचे, ऑटोरिक्षाचालक, अकोला.

विभाजनाचा विचार चांगला
बसस्थानकाचे विभाजन करण्याएवढे अकोला मोठे शहर नाही. मार्गनिहाय बसस्थानके मोठय़ा शहरांमध्ये निर्माण केल्या जातात. मात्र, वाहतुकीची समस्या निश्चितच निकाली निघणार असल्याने विचार चांगला आहे.
-ए. एम. शेंडे, व्यवस्थापक, अकोला आगार क्र. 2,

समस्या निकाली लागेल
शहरातील एसटी बसच्या वाहतुकीमुळे मोठय़ा प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. बसस्थानक स्थानांतरित केल्यास वाहतूक समस्या निकाली निघेल. अकोलेकरांना दिलासा मिळेल.
-शिवा ठाकूर, वाहतूक निरीक्षक, अकोला शहर

शहराचा विकास होईल
बसस्थानक चार भागांत विभाजन करून स्थानांतरित केल्यास शहराचा विकास होईल. वाहतुकीची समस्या निकाली निघेल. प्रवाशांसाठी सोयीस्कर निर्णय राहील. या प्रकारे विभाजन करायला हवे.
-आमदार गोपीकिशन बाजोरिया, अकोला

शहरातील वाहतूक समस्या निकाली काढण्यासाठी एसटी बसला शहरातून कायमची ‘एक्झिट’ घेणे आवश्यक आहे. शहरालगत प्रमुख चार मार्गांवर चार बसस्थानके स्थापन केल्यास शहरामध्ये एसटी बसला प्रवेश करण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे वाहतूक समस्या निकाली निघण्यासोबतच सर्वचदृष्टीकोनातून सोईस्कर ठरू शकेल.

विकासात्मक दृष्टी ठेवून अशा प्रकारे होऊ शकतात नवीन बसस्थानके

सध्याचे बसस्थानक
मूर्तिजापूरकडून अकोल्यात येणार्‍या बसगाड्यांची संख्या मोठी आहे. या गाड्यांना शहरात दाखल झाल्यावरही मोठे अंतर कापावे लागते. शिवणी जवळ बसस्थानक झाल्यास बसेसला शहरात येण्याची गरज राहणार नाही.

वाशिम, हिंगोली, नांदेड मार्गी थेट हैदराबाद पर्यंत हा मार्ग जोडला गेला आहे. यामार्गावरून आंतरराज्य बससेवेसह असंख्य बसगाड्या धावतात. त्यासाठी वाशिम बायपास जवळ बसस्थानक उत्तम ठरेल.

राष्ट्रीय महामार्ग सहा वरून खामगाव मार्गी सर्वाधिक बसगाड्या अकोल्यात दाखल होतात. बाळापूर नाक्यासमोर बसस्थानक स्थापन केल्यास बाहेरच्या बाहेरून त्या बसेस परत जाऊ शकतील.

अकोट मार्गावर बसस्थानक
अकोट मार्गावर नवीन बसस्थानक निर्माण केल्यास अकोट, परतवाडा, दहिहांडा, अंतजनगाव सूर्जी, तेल्हारा, हिवरखेड, दर्यापूर आदींसह मध्य प्रदेशमध्ये जाणार्‍या गाड्यांना तेथेच शेवटचा थांबा दिल्या जाऊ शकतो. त्यामुळे त्या बसगाड्यांना शहरात दाखल होण्याची गरज राहणार नाही.