आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिढा सुरक्षित शहर बस सेवेचा; ‘फिटनेस’ पाठपुराव्याची ‘हॅट्ट्रिक’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- अकोलेकरांचा सुरक्षित शहर प्रवासाचा तिढा सुटण्याची शक्यता नसून, बसेसचे ‘फिटनेस सर्टिफिकेट’ प्राप्त करून घेण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने मनपा आयुक्तांना तिसरे पत्र दिले आहे. शहर बससेवेचा उपक्रम शिवसेना-भाजप युतीच्या काळात मनपाने 10 वर्षांपूर्वी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सुरू केला. मात्र, बहुतांश सिटी बसमधून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. बस उपक्रमासाठी मनपा, अकोला प्रवासी व मालवाहतूक सहकारी संस्थेमध्ये करार झाला आहे.

बसेस होताहेत निकामी
सध्या 23 पैकी 14 बसेस नादुरुस्त झाल्या आहेत. बसेसच्या दुरुस्तीसाठी संस्थेकडे पुरेसा पैसाच नाही. त्यामुळे अनेक बसेस उभ्या आहेत. रस्त्यावर धावत असलेल्या बसचा एखादा पार्ट निकामी झाल्यास उभ्या असलेल्या मात्र थोडा चांगला असलेल्या बसचा पार्ट काढायचा आणि तो पार्ट धावत असलेल्या बसला लावायचा. त्यामुळे अनेक बसेस निकामी होत आहेत.

तरच मिळेल ‘फिटनेस सर्टिफिकेट’
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय फिटनेस सर्टिफिकेट प्रदान करते. वाहन सुरक्षितपणे रस्त्यावर धावू शकते, याची खात्री झाल्यानंतरच हे फिटनेस सर्टिफिकेट प्रदान केले जाते.

आरटीओंनी दिले कारवाईचे आदेश
सिटी बसेसला अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने परमीट दिले आहेत. विना ‘फिटनेस सर्टिफिकेट’ धावत असलेल्या बसेसवर कारवाईचे आदेश आरटीओंनी अकोला येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाला दिले आहेत.

पीएफची रक्कम भरू
कर्मचार्‍यांची भविष्य निर्वाह निधीची तीन महिन्यांची रक्कम भरलेली नाही. दोन महिन्यांची रक्कम आज भरण्यात येईल. उर्वरित रक्कम लवकरच भरण्यात येईल.
- डी. एस. वैराळे, व्यवस्थापक.

वाहक-चालकांवर उपासमारीची वेळ
शहर बस सेवा उपक्रमामध्ये 85 कर्मचारी कार्यरत आहेत. 23 बसेसनुसार वाहक-चालकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र, सध्या तब्बल 14 बसेस नादुरुस्त असल्याने रोज अनेक वाहक-कर्मचार्‍यांना काम न करताच घरी जावे लागते.‘नो वर्क नो पे’ या तत्त्वावर हे कर्मचारी काम करत असल्याने काम न मिळणार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे या कर्मचार्‍यांचा विचार करणे आवश्यक आहे.

संस्थेची जबाबदारी
फिटनेस सर्टिफिकेट प्राप्त करून घेण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची आहे. यासाठी संस्थेकडे पत्र दिले असून, पाठपुरावाही करण्यात येत आहे.
-दीपक चौधरी, आयुक्त, मनपा

दुरुस्तीसाठी निधी नाही
बसेस दुरुस्तीसाठी संस्थेकडे निधी नाही. निधीची व्यवस्था झाल्यानंतर बसेस दुरुस्त करण्यात येतील. त्यानंतरच फिटनेस सर्टिफिकेट प्राप्त करणे शक्य होईल.
-मनप्रीत सेठी, मुख्य प्रशासक