आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Corporation Finance Department Not Yet Cleared For 2013 14

अकोला मनपाच्या खर्चाचे कॅलेंडर दहा दिवसांनी पडले मागे, देयके काढण्याचा सपाटा सुरूच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एकीकडे २०१५-२०१६ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाल्याचा फायदा घेत, कर्मचाऱ्यांचे वेतन देणे शक्य नसल्याची बतावणी करणाऱ्या प्रशासनाने देयके काढण्यासाठी मात्र अद्यापही ३१ मार्च क्लोज केलेला नाही.
दररोज येणारी वसुली त्याच दिनांकात बँकेत जमा केली जात आहे. परंतु, खर्च करतानाचा दिनांक मात्र अद्यापही ३१ मार्चच दाखवला जात आहे. प्रशासनाच्या या बनवाबनवीकडे पदाधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केले आहे.
महापालिका प्रशासनाने २०१५-२०१६ या वर्षाचे अंदाजपत्रक महासभेपुढे २४ मार्चला सादर केले होते. परंतु, अंतर्गत कलहामुळे अंदाजपत्रकाची ही सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे प्रशासनालाही एक नवे शस्त्र हातात मिळाले. अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतनही काढता येणार नाही तसेच इतर कोणताही खर्च करता येणार नाही, अशी दवंडी पिटली.
वास्तव पाहता ३१ मार्चमुळे महापालिकेत मोठ्या प्रमाणात महसूल संकलित झाला आहे. कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन थकले आहे तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणीही थकली आहेत. परंतु, अंदाजपत्रक मंजूर नसल्याची सबब पुढे करून देयके काढण्याचा सपाटा सुरू असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येही प्रशासनाप्रति संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने मालमत्ता कराची वसुली करताना २५ मार्चनंतर धनादेश स्वीकारले नाहीत. कारण दिलेल्या धनादेशांपैकी काही धनादेश ३१ मार्चनंतर विड्रॉल होतात. त्यामुळे ही रक्कम पुढील आर्थिक वर्षात जाते, असे कारण पुढे केले. प्रशासनाने दिलेले हे कारण योग्य आहे. मात्र, हेच कारण प्रशासनाने खर्चाच्या बाबतीत लागू केले नाही.
खर्चाची ३१ मार्च हा दिनांक अद्याप क्लोज केला नाही. त्यामुळे खर्चाच्या रजिस्टरवर अद्यापही ३१ मार्च हाच दिनांक सुरू आहे. प्रशासनाच्या या बनवाबनवीकडे पदाधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केले आहे.