आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला पोलिसांना गावगुंडांचे आव्हान; तपासात पोलिसांची दमछाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- मलकापूरचे सरपंच, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सिद्धेश्वर देशमुख हत्याकांड, सोमवारी 19 ऑगस्टला व्यापार्‍यावर झालेला प्राणघातक हल्ला आणि दुचाकी पेटवून दिल्याच्या घटनेतील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. अकोलेकरांच्या सुरक्षेचे धिंडवडे काढणार्‍या गावगुंडांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केल्याचे या दोन्ही घटनांवरून दिसून आले.

अकोल्यातील अनेक भागांमध्ये गावगुंडांच्या टोळ्याच सक्रिय आहेत. अवैध धंद्यांच्या माध्यमातून या टोळ्या आर्थिकदृष्ट्या गब्बर झाल्या आहेत. पोलिसांना नियमित ‘पुरवठा’ होत असल्याने या गुंडांचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे इतर गावगुंडांची हिंमत वाढत चालली आहे. कायद्यासह पोलिसांचा धाकच नसल्याने भरदिवसा सिद्धेश्वर देशमुख हत्याकांड घडते. रस्त्यातच दुचाकी पेटवून देण्याइतपत गुंडांची मजल जाते आहे. अकोल्यात सक्षम पोलिस अधिकारी यावा अशी मागणी होत आहे.

व्यापारी हल्ला प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. ही घटना 19 ऑगस्टला घडली होती. त्यात एक व्यक्ती जखमी झाला होता.

दृष्टिक्षेप घटनेवर..
चंद्रकुमार केसवाणी, विकी वाधवाणी, संतोष मनवाणी हे तीन मित्र सिंधी कॅम्पकडे निघाले. या वेळी एमएच 37-ए 1930 या कारचा दुचाकीला धक्का लागला. त्यामुळे वाद झाला. या वादातून चंद्रकुमार केसवाणीवर कारमधील तिघांनी चाकूने हल्ला केला आणि दुचाकी पेटवून दिली होती.
दरम्यान, सिव्हिल लाइन्स पोलिसांनी हल्लेखोरांनी गुन्ह्यात वापरलेली हुंडाई कंपनीची सँट्रो ही कार पहाटे जप्त केली. ही कार जनता बाजाराजवळ बेवारस आढळून आली होती. या कारचा मालक अकोल्यातील असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

आरोपींचा शोध सुरू
दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा, संबंधित पोलिस अधिकारी-कर्मचारी झटत आहेत. त्यामुळे आरोपींना जेरबंद करण्यात लवकरच यश येईल.
-निकेश खाटमोडे पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक

आरोपी बदलताहेत मोबाइल फोन
पोलिस सिद्धेश्वर देशमुख हत्याकांडातील आरोपींचा मोबाइल कॉल डाटा प्राप्त करत आहेत. मात्र, आरोपी मोबाइल फोन आणि सीम कार्डही बदलत असल्याने त्यांचे लोकेशन मिळण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.आरोपी निष्पन्न
व्यापारी हल्ला प्रकरणातील आरोपी निष्पन्न झाले आहेत. आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.’’ प्रकाश सावकार, ठाणेदार, सिव्हिल लाइन्स पोलिस ठाणे.

दृष्टिक्षेप घटनेवर.
सिद्धेश्वर देशमुख यांच्यावर शुक्रवार, 23 ऑगस्टला मलकापूर येथे गोळीबार झाला. या वेळी त्यांच्यावर चाकूने वारही केले. याप्रकरणी खदान पोलिसांनी मोहन उर्फ बबलू मार्कंड, अविनाश वानखडे, नीलेश काळंके विरुद्ध गुन्हा दाखल केला.

तयारी करूनच फरार.
सिद्धेश्वर देशमुख हत्याकांड नियोजन करूनच घडवण्यात आले. सिद्धेश्वर यांच्यावर पाळत ठेवणे, देशी पिस्टलची सोय करणे, पिस्टलने धोका दिल्यास ‘गेम’ करण्यासाठी चाकू सोबत ठेवणे, फरारीच्या काळात आवश्यक ‘सुविधां’ची तजवीजही आरोपींनी करून ठेवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परिणामस्वरूप आरोपींपर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे.

शरणागतीची शक्यता..
सिद्धेश्वर देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर हत्याकांडातील आरोपी पोलिसांसमोर शरणागती पत्करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अद्यापही आरोपींनी ना शरणागती पत्करली ना पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आले.

आरोपींच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत. या पथकांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात यश येईल.
- शैलेश सपकाळ, ठाणेदार, खदान पोलिस स्टेशन.