आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Distict Political Review For Maharashra Assembly Election 2014

शेवटच्या चरणात तिरंगी लढती, अकोला जिल्ह्याचे चित्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- सुरुवातीला पंचरंगी, चौरंगी दिसणार्‍या लढती आता तिरंगी, तर काही मतदारसंघात थेट होताना दिसत आहेत. मोदी लाटेचा प्रभाव अकोला जिल्ह्यात दिसत असला, तरी उमेदवारांची ज्या ठिकाणी चुकीची निवड झाली तिथे लाटेचा परिणामदेखील शून्य राहणार असल्याचे बोलले जात आहे.
अकोला पूर्व
अकोला पूर्व मतदारसंघात भारिपचे हरिदास भदे, शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया, राष्ट्रवादीचे शिरीष धोत्रे, भाजपचे रणधीर सावरकर आणि काँग्रेसचे डॉ. सुभाषचंद्र कोरपे हे तगडे उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. एखाद्या मुद्द्यावर निवडणूक फिरणे हा जो प्रकार असतो, तो या मतदारसंघात घडण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. एकाच विचारधारेचे तीन उमेदवार लढतीत असल्याने कोणाला तरी वेळेवर नमते घ्यावे लागेल, त्याचा फायदा नेमका कोणाला मिळतो, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. त्यादृष्टीने विचार केला तर भदे, बाजोरिया, धोत्रे असा सामना शेवटच्या क्षणी होऊ शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. परंतु, सावरकर आणि कोरपे हेही ताकद आजमावत आहेत. काट्याची लढत येथे रंगताना दिसत आहे.

अकोट
अकोट मतदारसंघामध्ये मुरब्बी राजकारण्यांविरुद्ध तरुण उमेदवार असा सामना रंगताना दिसतो आहे. येथे भाजप, शिवसेना अशी सरळ लढत होईल, असे मानले जात आहे. परंतु, काँग्रेसचे महेश गणगणे यांच्यामागे ज्येष्ठ नेते सुधाकरराव गणगणे यांनी शक्ती उभी केलेली आहे. भाजपचे प्रकाश भारसाकळे यांनी शिवसेनेचे संजय गावंडे यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. अकोट, तेल्हारा तालुक्यामध्ये भाजपची बांधणी चांगली आहे तसेच विधानसभा निवडणूक लढण्याचा गाढा अनुभव भारसाकळे यांच्या पाठीशी असल्याने त्याचा फायदा त्यांना कितपत होतो, याकडे मतदारसंघाचे लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांनी अकोल्याला प्रचार सभा घेऊन सेनेसाठी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो सपशेल फेल ठरला. म्हणावी तशी उपस्थिती नव्हती. भारिपचे प्रदीप वानखडे, राष्ट्रवादीचे राजीव बोचे हे उमेदवार प्रबळ विरोधकांची किती मते ‍विस्कटू शकतात, याविषयीची चर्चा सुरू झाली आहे.

मूर्तिजापूर
मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये भाजपचे हरीश पिंपळे दुसर्‍यांदा भाग्य आजमावत आहेत. या मतदारसंघात सुरुवातीला दिसणारी पंचरंगी लढत चौरंगी होणार असल्याचे चित्र आहे. पिंपळे, शिवसेनेचे महादेव गवळे, भारिपचे राहुल डोंगरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर विल्हेकर यांच्यात चुरशीची लढत होईल, असे दिसते. काँग्रेसचे श्रावण इंगळे यांना वातावरण तयार करण्यात अद्याप यश आलेले नाही, असे दिसून येत आहे. काँग्रेसच्या परंपरागत मतांमध्ये ते आणखी किती भर टाकू शकतात, यावर यशापयश अवलंबून राहणार आहे. भाजपचे हरीश पिंपळे यांनी मतदारसंघातील नाराजी दूर करण्यात यश मिळवल्याचे सध्या बोलले जात आहे. भारिपच्या परंपरागत मतांचा डोंगरे यांना लाभ होईल. भारिपचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या मतदारसंघाकडे लक्ष घातल्याने मतदारांमध्ये चैतन्य आल्याचे दिसत आहे. तसेही गवळे यांचा प्रभाव ग्रामीण भागात, तर विल्हेकर यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ती उभी राहिलेली दिसत आहे.

बाळापूर
बाळापूर मतदारसंघात भारिपचे बळीराम सिरस्कार यांच्याविरुद्ध काँग्रेसने अॅड. नतिकोद्दीन खतीब, भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, शिवसेनेचे कालीन लांडे हे प्रमुख उमेदवार आहेत. या मतदारसंघातही मतांची विभागणी होत आहे. थोरात, लांडे आणि अपक्ष म्हणून रिंगणात असलेले संदीप पाटील यांच्यात मते विभागली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने पातूरचे नगराध्यक्ष हिदायतखान रुमखान यांना उमेदवारी दिली आहे. खतीब आणि हिदायतखान यांच्यात मते विभागली जातील तसेच मुकीम अहमद हेही येथे नशीब आजमावत आहेत. अपक्ष म्हणून माजी आमदार नारायणराव गव्हाणकर रिंगणात आहेत. तेजराव थोरात भाजपचे अधिकृत उमेदवार असताना संदीप पाटील यांनी प्रचार साहित्यावर मोदी यांच्या फोटोचा वापर केला. यावरून भाजपमध्ये चांगलाच गदारोळ झाला. भाजपच्या लिगल सेलचे सहसंयोजक अॅड. विनोद तिवारी यांनी पत्रकार परिषद घेऊन पाटील भाजपचे अधिकृत उमेदवार नाहीत, तेजराव थोरात हेच आमचे उमेदवार आहेत. दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्ट करावे लागले. वाद-प्रतिवादामुळे भाजपला फायदा होतो की तोटा, हे बघायचे.

अकोला पश्चिम
अकोला पश्चिम मतदारसंघात निर्माण झालेले विरोधी वातावरण आपल्या बाजूने करण्यात भाजपचे गोवर्धन शर्मा किती यशस्वी ठरतात, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. गेल्या चार निवडणुकांच्या तुलनेत शर्मा यांना ही निवडणूक सोपी नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय देशमुख, शिवसेनेचे गुलाबराव गावंडे, काँग्रेसच्या उषा विरक यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. युवकांमध्ये असलेली लोकप्रियता तसेच सर्व समाजामध्ये असलेला वावर ही देशमुख यांची जमेची बाजू िदसत आहे. मतदारसंघ बदलला तरी आपली करामत दाखवण्यात यशस्वी ठरणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव गावंडे यांना शर्मा, देशमुख या जुन्या सहकाऱ्यांशीच दोन हात करावे लागत आहेत. तर, काँग्रेसच्या उषा विरक यांचा भर काँग्रेसच्या पारंपरिक मतांवर राहणार आहे. अन्य पक्षांच्या तुलनेत काँग्रेसचे संघटन कमकुवत असल्याने काँग्रेस उमेदवारांसाठी ती उणी बाजू ठरत आली आहे. ऐन निवडणुकीदरम्यान, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निलंबित करण्यात आल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. सध्या दिसत असलेली चौरंगी लढत भाजप, सेना, राष्ट्रवादी अशी तिरंगी होण्याची शक्यता आहे.