आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळापूर मतदारसंघात ज्येष्ठांनीही थोपटले दंड!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढू, असे स्पष्ट संकेत ज्येष्ठ व तरुण नेत्यांनी आज ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिले. राजकीय क्षेत्रात आपण माघारी फिरलो नसून, पक्षाच्या आदेशानुसार कुणाच्याही विरोधात लढा देण्याचा निर्धार ज्येष्ठांनी व्यक्त केला. बाळापूर विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष असून, हा मतदारसंघ भारिप-बमसंच्या ताब्यात आहे. बळीराम शिरस्कार हे विद्यमान आमदार आहेत. लोकसभा निवडणूकीत भारिप-बमसंचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांना बाळापूर येथून प्राप्त मतदानाच्या टक्केवारीवर येथील उमेदवारी निश्चित होईल, असा होरा राजकीय विश्लेषकांचा आहे.

आघाडीमध्ये बाळापूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घेण्यास इच्छुक आहे. तसे झाल्यास या मतदारसंघात विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिडकर हे इच्छुक म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी तशी मागणी बिडकर यांना नुकतीच केल्याने त्यांचा या मतदारसंघात प्रवेश होण्याची शक्यता आहे. माजी आमदार नारायण गव्हाणकर हेदेखील पुन्हा पक्षाने उमेदवारी दिल्यास उभे राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसने हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडला नाही तर येथे काँग्रेसतर्फे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव तायडे किंवा त्यांचे पुत्र प्रकाश तायडे यांची उमेदवारी निश्चित मानली जाऊ शकते. माजी आमदार नातिकोद्दीन खतीब इच्छुक आहेत. राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये दाखल डॉ. जगन्नाथ ढोणे हेदेखील येथे इच्छुक असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी वैयक्तिक मैत्री असलेले उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार असल्याचे चित्र आहे.

शिक्षक मतदारसंघ नाहीतर बाळापूर
शिक्षक मतदारसंघाची बांधणी सुरू आहे. या मतदारसंघासाठी इच्छुक असून, याव्यतिरिक्त पक्षाने आदेश दिल्यास बाळापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणे शक्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला बाळापूर विधानसभा मतदारसंघ सोडण्याची सूतराम शक्यता नाही. पक्षाने तरुण रक्ताला संधी दिल्यास बाळापूर या मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक आहे.’’
प्रकाश तायडे अध्यक्ष, विभागीय काँग्रेस शिक्षक सेल.

पक्षाने आदेश दिला तर लढणार
पक्षाने आदेश दिला तर निश्चित पुन्हा लढणार आहे. सर्वच समाजघटकांना न्याय देण्यासाठी आज लढा सुरू आहे, तो यापुढे कायम राहील. बाळापूर मतदारसंघातील प्रत्येक गाव, कार्यकर्त्यांशी वैयक्तिक संबंध अद्यापही कायम आहेत, तीच आपली पुंजी आहे.
नारायण गव्हाणकर, माजी आमदार

मित्राच्या विरोधात लढू
पक्षाने आदेश दिला तर मित्राच्या विरोधात लढा देऊ. अद्याप मी राजकारणातून निवृत्त झालेलो नाही. पक्ष म्हणेल तरच लढेल. बंडखोरी हा शब्द आपल्या शब्दकोशात नाही. बाळापूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आला आणि पक्षाने आदेश दिला तर निश्चित विजयी होईल. ’’
तुकाराम बिडकर, माजी आमदार