आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"जादूटोणाविरोधी'ची जागृती करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महत्प्रयासानंतर जादूटोणाविरोधी कायद्याची निर्मिती झाली असली, तरी कायदा राबवणाऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये त्याबाबत अद्याप पूर्ण जागृती नाही. कायदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाच्या सहकार्याने अनेकविध उपक्रम आगामी काळात राबवणार असल्याची माहिती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी दिली.

शासकीय विश्रामगृहावर सोमवारी पत्रकारांशी ते संवाद साधत होते. जादूटोणाविरोधी कायदा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेकविध उपक्रम राबवण्यात येत असून, वक्ता प्रशिक्षण, वर्ग एकचे पोलिस अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे. २३ जूनला अकोला वाशीम जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसाठी असा वर्ग होणार आहे. हा कायदा राबवणाऱ्या अधिकाऱ्यांना पूर्णत: कळावा म्हणून मी स्वत: राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात अशा वर्गांमधून मार्गदर्शन करत आहे. कोकण नाशिक विभागातील प्रशिक्षण पूर्ण झाले असून, आता विदर्भातील प्रशिक्षणास प्रारंभ झाला आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या सौजन्याने प्रचार-प्रसाराकरिता अनेकविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. राज्यभरात ३५ जिल्ह्यात वैज्ञानिक दृष्टिकोन जादूटोणाविरोधी कायदा या विषयावर जाहीर व्याख्याने झाली. दरम्यान, शासन बदलले. भाजपच्या शासनानेही या कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद दिला असून, आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांमधून कार्यक्रम आयोजित होणार आहेत. विदर्भात २५ जूनला यवतमाळ, २९ ला अमरावतीत प्रशिक्षण वर्ग होणार असून, जुलै महिन्यामध्ये गोंदिया, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर आदी ठिकाणी प्रशिक्षण, सभांचे आयोजन केले आहे, असेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला राज्य समन्वयक प्रवीण गांगुर्डे, विदर्भ संघटक किशाेर वाघ, जिल्हा संघटक गजानन पारधी, महानगर संघटक स्वप्ना लांडे, शरद वानखडे, प्रदीप गुरुखुद्दे उपस्थित होते.
पुरोगामी विचारांची हत्या सुरूच राहणार

नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर हे सत्र थांबणार नसून, मोठी यादी तयार आहे. त्यामुळे आगामी काळात पुरोगामी विचारांची हत्या ही सुरूच राहणार आहे. मात्र, आम्ही आमचे कार्य सुरूच ठेवणार आहोत. जादूटोणाविरोधी कायदा घराघरांत पोहोचवण्याचा आम्ही वसा घेतला आहे, असेही प्रा. श्याम मानव या वेळी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...