आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण : सर्व मतदारसंघात तरुणाईच ठरणार निर्णायक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. प्रत्येक उमेदवाराने आपल्या विजयासाठी कंबर कसली असून, पक्षातील ज्येष्ठ मंडळींच्या सभा, झंझावती दौरे, रोड शो, कॉर्नर सभांचे आयोजनही सर्वच मतदारसंघात होत आहे. आतापर्यंत जात फॅक्टर महत्त्वाचा मानला जात होता, परंतु या वेळी सोशल नेटवर्कच्या वाढत्या वापरामुळे तरुणाई फॅक्टरचाही विचार करावा लागत आहे. नव्याने झालेल्या मतदार नोंदणीत तरुणाईचा टक्का वाढला असून, ते निर्णायक भूमिका या निवडणुकीत बजावणार आहेत. त्यामुळे तरुण वर्ग नेमके कोणाच्या पाठीशी उभे राहतात, यावरच विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबर २०१४ रोजी जिल्ह्यातील अकोट (२८), बाळापूर (२९), अकोला पश्चिम (३०), अकोला पूर्व (३१), मूर्तिजापूर (३२) या पाच विधानसभा मतदारसंघात मतदान होऊ घातले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पारदर्शी होण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. तत्पूर्वी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यात येत असून, नवीन मतदार नोंदणीसाठी विशेष अभियान यापूर्वीच राबवण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येकच मतदारसंघात मतदारांची संख्या वाढली आहे. या वाढीव मतदारांमध्ये वयाची १८ वर्षे पूर्ण करून प्रथमच मतदान करणाऱ्यांची संख्या चांगली आहे. त्यासोबतच सून म्हणून जिल्ह्यात आलेल्या तरुणींची यामध्ये नोंद आहे.

सर्वच मतदारसंघातील मतदारांमध्ये तरुणाईचा टक्का वाढल्याने त्यांची भूमिका निर्णायक आहे. आजची तरुणाई राजकारणासह, समाजकारणात मोठ्या प्रमाणावर रस घेणारी असून, अद्ययावत तंत्रज्ञान वापरणारी आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलाच मतदारसंघ नव्हे तर इतर मतदारसंघ, त्यांची स्थिती, राज्य, देश नव्हे जगभरातील माहिती घेऊन अपडेट असलेली आहे. त्यांच्या निर्णयाला घरातही महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे त्यांची पसंती महत्त्वाची ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतरची वाढ लक्षात घेतली तर जिल्हाभरात ३५ हजारांवर मतदार वाढले आहे. तर २००९ च्या मतदारांशी प्रत्येक मतदारसंघाची तुलना केल्यास प्रत्येक मतदारसंघात ३० हजारांवर मतदार वाढले आहेत. तर पाचही मतदारसंघातून लाख ७१ हजारांवर मतदार वाढले आहेत. यात युवा मतदारांचा समावेश अधिक आहे. तसेच यंदा प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे विजयी उमेदवार दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारामध्ये फार कमी अंतर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढीव मतदारांमधील तरुण टक्का निर्णायक ठरणार आहे.