आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काठमांडूहून घरी पोहोचलो, यावर विश्वासच बसत नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोल्याचे संतोष देशमुख यांच्या नेतृत्वात निर्माण फर्टिलायझर कंपनीचे ५५ शेतकरी व्यापारी नेपाळ येथील काठमांडूला २२ एप्रिल रोजी अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते. तेथे पोहोचल्यावर भूकंपाचे प्रचंड धक्के संपूर्ण नेपाळला बसले. जेव्हा भूकंप आला तेव्हा वेळ होती दुपारी १२.३५ वाजताची. देशमुख त्यांचे सहकारी हे काठमांडूपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या काकरा येथे देवीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. दरम्यान, ते नदीमध्ये स्नान करत होते. जितके लोक काकरा येथील नदीमध्ये होते, ते सर्वच सुखरूप असल्याचे संतोष देशमुख यांनी "दिव्य मराठी'ला सांगितले. ४६ वर्षीय संतोष देशमुख हे संत तुकाराम चौकात राहतात. ते निर्माण कंपनीतर्फे ५४ लोकांना अभ्यास दौऱ्यासाठी काठमांडूला घेऊन गेले होते. त्यांनी अनुभवलेला थरार त्यांच्याच शब्दात...
जमीन हादरली अन् प्रचंड धुळीचा लोट आला...
आम्ही२२ एप्रिलला काठमांडूला पोहोचलो. तेथे वैशाली हॉटेलमध्ये दोन दिवस मुक्काम केला. २५ तारखेला काठमांडूपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या काकरा येथे गेलो. तेथे मनोकामना देवीचे मंदिर आहे. जेवणाची वेळ झाल्यामुळे एका हॉटेलमध्ये गेलो. मात्र, हॉटेलमध्ये चपाती नसल्यामुळे, चपाती तयार होईपर्यंत नदीत स्नानासाठी गेलो. तेथे १००० च्या वर पर्यटक असतील. आम्ही १२.३५ वाजता पाण्यामध्येच असताना जमीन हादरली. नंतर मोठ्या प्रमाणात मातीचा भपका म्हणजेच वावटळ आली. भूकंप झाल्याचे आमच्या लक्षात आले. सर्वजण पळू लागले. आम्ही परत हॉटेलकडे आलो. पाहतो तर हॉटेलचे कौले पडलेली. मात्र, जीवितहानीझाली नव्हती. आम्ही घाबरलेल्या अवस्थेत तसेच काठमांडूसाठी निघालो. रस्त्यात मोठ्या दरडी कोसळल्या होत्या. इतर पर्यटकांसह दगड बाजूला सारत वाट काढत सायंकाळी ६.३० वाजता काठमांडूला पोहोचलो. बघतो तर काठमांडूमध्ये हाहाकार. बिल्डिंग पडलेल्या, मृतदेहांचा खच पडलेला... लोकांचे चित्कार ऐकून घामाघूम झालो. काहीच कळत नव्हते. परत हॉटेलमध्ये आलो. हॉटेल भूकंपनिरोधी असल्यामुळे काही भाग पडला होता. हॉटेलमध्ये शिरायची कुणाची हिंमत होत नव्हती. सर्वत्र अंधार. लाइटचा पत्ता नाही. काही वेळ जनरेटर चालले. नंतर तेही बंद झाले. रात्रभर मदत कार्य सुरू होते. सकाळी उठल्याबरोबर थेट विमानतळ गाठले. विमानतळावर प्रत्येक देशाचे झेंडे घेऊन कर्मचारी होते. आम्ही आपल्या झेंड्याजवळ गेलो. मात्र, आम्हाला मदत मिळाली नाही. हताश होऊन पुन्हा हॉटेलला परतावे लागले. कंपनीचे एमडी अभिजित देशमुख यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर नितीन गडकरी यांच्या माध्यमातून आम्हाला मदत मिळाली. सोमवारी रात्री वाजता आम्हाला दिल्लीला आणण्यासाठी विमान पोहोचले. त्याने आम्ही १०.३० वाजता दिल्लीला पोहोचलो. त्यानंतर रात्री ११.३० वाजता आम्ही मुंबईला अालो. सकाळी सर्व आपापल्या गावी निघून गेले. मी रेल्वेस्थानकावर पोहोचलो सकाळी सहा वाजता गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बसून दुपारी २.३० वाजता अकोल्यात पोहोचलो. तेथे घरचे उपस्थित होते. मी खरेच अकोल्यात आलो, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. आता जराही खटकन आवाज झाला, तरीही माझ्या छातीत धडधड होते.