अकोला - जिल्हाक्राइम रेट कंट्रोलमध्ये अमरावती विभागातून पहिल्या स्थानावर आला आहे. २०१३ मध्ये टक्के असलेला क्राइम कंट्रोल रेट २०१४ मध्ये १५.७४ टक्क्यांवर गेला आहे. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अखत्यारीत असलेल्या विशेष पथकाने जिल्हाभर छापे टाकून ७४ लाख २७ हजार ५३५ रुपये जप्त केले असून, विविध गुन्ह्यांमध्ये २४७ आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी दिली. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
सहा महिन्यांचा
आपल्या कामगिरीचा आढावा सादर करताना चंद्र किशोर मीणा म्हणाले की, पोलिस दलामध्ये अनेक बदल केले आहेत. जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. त्या पथकाने तीन महिन्यांमध्ये ७५ छापे टाकले. त्यातून २४७ आरोपींना अटक केली आहे, तर त्यांच्याकडून ७४ लाख २७ हजार ५३५ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दोन महिन्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने ६६ गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २६ जानेवारीपासून महिला हेल्पलाइन सुरू करण्यात अाली असून, त्यासाठी १०९१ टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. या नंबरवर चिडीमारी आणि महिलांना त्रास देणा-या घटना घडत असल्यास महिलांनी फोन करून आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यात येत आहे.
प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये महिला तक्रार निवारण महिला अधिका-यांची नेमणूक केली आहे. महिलांच्या तक्रारींची दखल या तक्रार निवारण महिला अधिका-यांच्या माध्यमातून हाेणार अाहे. तसेच जिल्ह्यामध्ये दंगलीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, तर अँटी गुंडा स्कॉड पथकाच्या बरखास्तीबाबत विचारले असता, मी दर तीन महिन्यांनी माणसे बदलत असतो, ही माझी काम करण्याची पद्धत असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा म्हणाले.
सात दिवसांमध्ये रेल्वेस्थानकावर पोलिस चौकी
रात्रीच्यावेळी रेल्वेस्थानक परिसरात गुंड वावरतात. त्यांचा त्रास अनेक प्रवाशांना होतो. जीआरपीएफकडे मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे गुंडांना आवर घालण्यात अडचण निर्माण होत आहे. त्यासंबंधीचे वृत्त प्रथम दिव्य मराठीने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी रेल्वेस्थानक परिसरात सात दिवसांच्या आत पोलिस चौकी देण्याचे आश्वासन दिले आहे. सात दिवसांच्या आत रेल्वेस्थानकावर पोलिस चौकी असेल, असे त्यांनी सांगितले. गोंदिया जिल्ह्यामध्ये पोलिस अधीक्षक असताना चंद्र किशोर मीणा यांनी रेल्वेस्थानकावर कायमस्वरूपी पोलिस चौकी लावली होती.
पेट्रोलिंग व्हॅन
शहरामध्येपोलिस ठाण्यांची पेट्रोलिंग, रात्रीची गस्त आणि आणखी पाच वाहनांची पोलिस दलात भर पडल्याने पाच पेट्रोलिंग व्हॅन सुरू करण्यात आल्या आहेत. या व्हॅन सतत सुरू राहत आहेत. कंट्रोल रूममधून या व्हॅनचे नियंत्रण होत अाहे.