आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना 11 कोटी; लवकरच वितरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना महसूल विभाग मदत देणार आहे. कृषी विभागाने शेतकर्‍यांना मदत करण्याचे आदेश यापूर्वी शासनाने दिले होते. मात्र, हा निर्णय बदलवून आता महसूल विभाग 10 कोटी 96 लाख 59 हजार रुपयांची मदत शेतकर्‍यांना देणार आहे.
जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 35 हजार हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या शेतीचे सर्वेक्षणकरून जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे 17 कोटी 86 लाख 19 हजार 400 रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी शासनाकडून 10 कोटी 96 लाख 59 हजार रुपयांचा पहिला हप्ता जिल्हा प्रशासनाला मिळाला. या मदतीचे वाटप करण्याचे निर्देश शासनाने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला दिले होते. त्या निर्णयात शासनाने बदल करून, आता महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्याचे परिपत्रक काढले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी सर्वच तहसीलदारांना नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. अतिवृष्टीमुळे 35 हजार हेक्टरवर 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान अकोला तालुक्यात 15 हजार 830.06 हेक्टरवर झाले आहे. सर्वात कमी नुकसान पातूर तालुक्यात 162.90 हेक्टरमध्ये झाले आहे. प्रतिहेक्टर पाच हजार रुपयेप्रमाणे शेतकर्‍यांना मोबदला मिळणार आहे.