आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशाच्या आरासमध्ये पोहोचले ‘आयपीएल’; रंगीत कागद, वॉटर कलरचा वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - आता कावड उत्सव संपल्याने गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला असून, गणरायाची आरास करण्यासाठी सजावट साहित्याने बाजार सजला आहे. यामध्ये सजावट साहित्यातही ताज्या घडामोडी डोकावताना दिसत असून, आयपीएल 2013 असे लिहिलेले व लेदरबॉल, स्टम्प, बेल्स आदी क्रिकेटच्या वातावरणनिर्मिती करणारे घटक थर्मोकोल सजावटीत उपलब्ध आहे.

दरवर्षी गणरायाच्या सजावटीत वैविध्य दिसून येते. अलीकडे थर्मोकोल डेकोरेशनला वाढती मागणी. केवळ बडी मंडळेच नव्हे, तर घरोघरी थर्मोकोल मंदिरांना वाढती मागणी आहे. ही मागणी लक्षात घेता अशोक वाटिका परिसरात थर्मोकोल आरास साहित्याचे प्रदर्शन व विक्री सुरूआहे. येथील मंदिर अत्यंत आकर्षक असून, नवीन पद्धतीची आहे. यामध्ये अगदी 250 रुपयांपासून 15 हजारांपर्यंत थर्मोकोल मंदिर विक्रीस उपलब्ध आहे. या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे नावीण्यपूर्ण आकार, कोरीव काम, आकर्षक रंग आहेत.

यासोबतच इंडियन क्रिकेट प्रीमिअर लीग 2013 चे गणेश सिंहासन अकोलेकरांना आकर्षित करीत आहे. यासोबतच चायनागेट म्हणून नवीन पद्धतीचे डिझाईन उपलब्ध आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे खरेदीनंतर मंदिर घरी घेऊन जाणे सोयीस्कर आहे. कारण या मंदिराची आडवे थर लावून घडी करणे शक्य असून, घरी गेल्यानंतर त्यांची जोडणी करता येते. यांतील कार्विंग उत्तम आहे. सदर मंदिरे जळगाव, मुंबई, पुणे, कोल्हापूर येथून आयात केली असून, अकोल्यासह बुलडाणा, खामगाव, चिखली आदी ठिकाणीही त्यांची विक्री चांगली होत असल्याचे रोहित विखे यांनी सांगितले.

पारंपरिक थर्मोकोल मंदिरांनाही चांगली मागणी असून, त्यांचे दर एक फुटाच्या मंदिराला 200 रुपये, दोन फुटांना 300 रुपये, चार फुटांना 600 रुपये, तर पाच फूट उंचीच्या मंदिरासाठी 650 ते 700 रुपये किंमत आकारण्यात येते.
या मंदिरांना रंगवण्यासाठी रंगीत कागद, वॉटरकलरचा वापर केला असून, सजावटीसाठी लेस, चमकी आदींचा वापर केला आहे. या मंदिरांनाही चांगली मागणी असल्याचे पेन्टर वासुदेव सरतकार यांनी सांगितले.

छायाचित्र :
आला रे आला लालबागचा राजा
अकोला शहरातील गणेशोत्सवाचे आकर्षण, श्रद्धेचे केंद्र असलेल्या लालबागच्या राजाचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. ज्योती नगरातून मानेक चित्रपटगृहासमोरील मंडपात वारकरी, दिंडी पथकाच्या गजरात गणरायाचे आगमन झाले. मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. लालबागच्या राजाचा रथ ओढण्यात महिला मंडळीही मागे नव्हत्या.