Home | Maharashtra | Vidarva | Akola | akola has lot of potential for tourism

अकोल्यात पर्यटनाला अर्मयाद संधी

विलास देशमुख | Update - Sep 27, 2013, 10:50 AM IST

जिल्ह्यातील पर्यटनस्थळाचा विकास व नव्या पर्यटन स्थळांची निर्मिती करण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे आहे.

 • akola has lot of potential for tourism

  अकोला- जागतिक स्तरावर मंदी आल्यावरही कोणताच परिणाम न झालेले क्षेत्र म्हणजे पर्यटन. याच पर्यटनाच्या जोरावर गुजरात राज्याने आघाडी घेतली आहे. मात्र, विपुल जैवविविधता, ऐतिहासिक वारसा असतानाही पर्यटनस्थळांच्या योग्य मार्केटिंग व व्यवस्थापनात महाराष्ट्र कमी पडला आहे. अकोला जिल्ह्यातही निसर्ग, कृषी, धार्मिक, पक्षी पर्यटनाची मुबलक संधी उपलब्ध असली तरी ती ‘कॅश’ करण्यासाठी इच्छाशक्ती कमी पडत आहे. त्यामुळे 27 सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने जिल्ह्यातील या पर्यटन वारशांचा आढावा घेऊन भविष्यातील संधी शोधण्याची गरज व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील प्रशासन व लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळाचा विकास व नव्या पर्यटन स्थळांची निर्मिती करण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे आहे.

  काटेपूर्णा अभयारण्य

  अकोला, वाशिम जिल्ह्यातील अजिंठा पर्वतरांगांमध्ये वसलेले काटेपूर्णा अभयारण्य शहरापासून केवळ 37 किलोमीटर अंतरावर आहे. अभयारण्यातून वाहणार्‍या काटेपूर्णा नदीमुळे त्याचे नामकरण काटेपूर्णा अभयारण्य असे झाले. जैवविविधतेने नटलेल्या या अभयारण्यात बिबटे, अस्वल, चितळ, नीलगाय, रानडुक्कर, तडस, लांडगा, कोल्हे, रानमांजर, सायाळ आदी प्राण्यांचे वास्तव्य आहे. यासोबतच दीडशेवर पक्ष्यांच्या प्रजातीही आहेत. अभयारण्यात वाघा निसर्ग परिचय केंद्र, चाका लपणगृह, रिव्हर व्ह्यू पॉइंट, बनाई बेट, चौफुला, अमरकुंड, तंबरहुडी, काकडदरा, चिंचबन, घारीचा आसोडा, लांबी घाट डोंगर, येडशी निसर्ग पाऊलवाट, अंधार्‍यावड आदी महत्त्वपूर्ण स्थळे आहेत.

  वटवृक्षाचे अंबाशी

  शहरापासून 36 किलोमीटरवर असलेल्या पातूर तालुक्यातील अंबाशी येथील प्राचीन वटवृक्ष जिल्ह्यासाठी अद्वितीय असाच आहे. दीड हजार वर्षे पुरातन असलेला हा वटवृक्ष पूर्वी दोन एकरात पसरला होता. अवाढव्य असा हा वटवृक्ष अभ्यासकांसाठी एक पर्वणीच आहे. मात्र, त्याचा इतिहास किंवा फारशी माहिती अनेकांना नाही. या वटवृक्षाचा इतिहास, माहिती संकलित करून त्याचा प्रचार, प्रसार केल्यास येथे भेट देणार्‍यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

  कारंजा सोहोळ अभयारण्य

  अकोला वनविभागांतर्गत असलेले वाशिम जिल्ह्यातील कारंजा सोहोळ अभयारण्यही उत्तम पर्यटनस्थळ आहे. त्यामध्ये प्रामुख्याने काळविटांचा संचार असून, नीलगाय, रानडुक्कर, तडस, ससे, मोर, जंगली कबुतरे, तितर, बटेर, पिंगळा आदींसह विविध पक्षीही आढळतात. हे अभयारण्य कारंजा, गिर्डा, दादगाव व सोमठाणा नियतक्षेत्राच्या एक हजार 781.40 हेक्टरवर विस्तारलेले आहे. या ठिकाणी पर्यटकांनी निसर्ग पाऊलवाट, परिचय केंद्र, निसर्ग दर्शन मनोरा आदींची निर्मिती केली आहे.

  ज्ञानगंगा अभयारण्य

  अकोला वन्यजीव विभागाच्या अखत्यारीतील बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात भर उन्हाळ्यातही हिरवळीचा आनंद लुटता येतो. त्यामध्ये अस्वलांचा मुक्त संचारही अनुभवता येतो. ज्ञानगंगा नदीमुळे त्याचे नामकरण ज्ञानगंगा अभयारण्य असे झाले आहे. अभयारण्याचे क्षेत्रफळ 205 चौरस किलोमीटर असून, खामगाव, मोताळा, चिखली तालुक्यात हे अभयारण्य वसले आहे. अभयारण्यातील पलढग, माटरगाव, काशी नळकुंड ही महत्त्वाची स्थळे असून, पक्षी निरीक्षणासाठी उत्तम ठिकाणे आहेत. अभयारण्यात अस्वल, बिबट, तडस, रानमांजर, चिंकारा, भेडकी, नीलगाय, सायाळ, चौशिंगा, रानडुक्कर आदींचा वावर आहे.

  महत्त्वाचे : 0अकोल्यापासून अंतर 64 किलोमीटर 0जवळचे रेल्वेस्थानक : नागपूर, औरंगाबाद 0निवास व्यवस्था : प्रादेशिक वन विर्शामगृह, वरवंड बाळापूर तालुका

 • akola has lot of potential for tourism

  मन आणि मस नद्यांच्या संगमावर वसलेले बाळापूर हे ऐतिहासिक गाव असून, जहाँगीर, शाहजान व औरंगजेब हे सत्तेवर येण्यासाठी दक्षिणेचे सुभेदार म्हणून बाळापुरात काही महिने राहिले होते. बाळापूर येथील किल्ला औरंगजेबाचा मुलगा आदिमशाह याने सन 1721 मध्ये बांधला. हा किल्ला विटांनी बांधलेला आहे. मिर्झा राजे जयसिंग यांनी बांधलेली पाच घुमटांची छत्री प्रेक्षणीय आहे.

 • akola has lot of potential for tourism

  इतिहास, निसर्गाचा मिलाफ ‘नरनाळा’

  नरनाळा अभयारण्यात इतिहास व निसर्गाचा मिलाफ पर्यटकांना अनुभवावयास मिळतो. नरनाळा किंवा शहानूर हे ठिकाण सर्वात उंच डोंगरावर बांधलेल्या किल्ल्यामुळे प्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून तीन हजार फूट उंच असणारा नरनाळा किल्ला व अभयारण्य पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी शहानूर येथे माहिती केंद्र, भोजनावळ, वाहन व निवास व्यवस्था आहे. किल्ल्यावर अनेक बुरूज व 22 दरवाजे आहेत. त्यातील महाकाली दरवाजा स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण आहे. किल्ल्यावर अंबर महाल, राणी महाल, बुर्‍हानुद्दीन दर्गा, शक्कर तलाव, धोबी तलाव, नौगज तोफ, तोफखाना आदी ठिकाणांना पर्यटक भेट देतात. अभयारण्याचे क्षेत्र 12.35 चौरस किलोमीटर असून, ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या दक्षिणेस आहे. अभयारण्यात वाघ, बिबटे, अस्वल, भेडकी, सायाळ, ससे, सांबर, रानमांजर, मसन्या ऊद अशा अनेकविध वन्यजीवांसह विविध जातींच्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे. पक्ष्यांमध्ये मोर, स्क्वेल्स, सर्पगरुड, घार, शिक्रा, पिंगळा, मैना, भोरडी, राघू, रॉबिन, टिटवी, खंड्या, किरकुकू, तुरेवाला, वृक्षीय अबाबील, चातक, रानखाटीक, रानरातवा, स्वर्गीय नर्तक आदी 160 प्रजातींचे पक्षी आहेत.

  महत्त्वाचे : 0निवास : वन्यजीव विभाग विर्शामगृह, अकोट, शहानूर 0बसस्थानक : अकोला, अकोट 0अकोल्यापासून अंतर : 60 किलोमीटर 0अवश्य पाहा : महाकाली दरवाजा, शक्कर तलाव, नौगज तोफ, चंदनखोरा 0आरक्षण : उपवनसंरक्षक, वन्यजीव, अकोला
   

Trending