आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला शहरातील कावड उत्सवाला 68 वर्षांची परंपरा, डाबकीरोडची कावड ठरते आकर्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - कावडीने नदीचे जल आणून पवित्र र्शावणात देवाधिदेव महादेवास जलाभिषेक करण्याची प्रथा तशी देशभरात सर्वत्रच दिसून येत असली तरी, या प्रथेला अकोल्यात लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सन 1945 पासून सुरू असलेल्या या अद्वितीय कावड उत्सवाचे यंदा 68 वे वर्ष आहे. यंदाही कावडधारी शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असून, चौथ्या र्शावण सोमवारी महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी त्यांची तयारी सुरू झाली आहे.

सन 1942-43 दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. नागरिक पावसासाठी देवाला साकडे घालत होते. दरम्यान, जुने शहरातील नबाबपुरा भागातील काही उत्साही तरुणांनी चौकात मातीचे महादेवाची पिंड स्थापन करून पावसासाठी प्रार्थना केली.

दोन दिवसांनंतर जोरदार पाऊस येऊन मोर्णा नदीला पूर आला. जुने शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. मात्र, मातीचे लिंग तसेच होते. त्यामुळे भाविकांची र्शद्धा वृद्धिंगत होऊन तेथे नियमित पूजा-अर्चा सुरू झाली. त्यानंतर सन 1944 मध्ये त्या तरुणांनी रीतसर शिवभक्त मंडळाची स्थापना केली. त्या चौकात सध्याचे जागृतेश्वर मंदिर उदयास आले. त्यावर मोर्णा नदीचे जल आणून अभिषेक करणे, घरोघरी अन्नधान्य गोळा करून भंडार्‍याची प्रथा सुरू झाली. दुसर्‍या वर्षी सन 1945 मध्ये गांधीग्राम (वाघोली) येथील पूर्णा नदीचे जल भोपळ्याच्या कावडीने आणून महादेवाला अभिषेक करण्याच्या परंपरेला सखाराम वानखडे, श्री. कासार, बाबुराव कुंभार, श्री. कथले यांनी सुरुवात केली. त्यांना श्रीराजराजेश्वर मंदिर व लक्ष्मीनारायण मंदिरात चौघडा वाजवणार्‍या गणपतरावांचे प्रोत्साहन मिळाले. ही प्रथा अखंड सुरूहोती. दरम्यान, देश स्वतंत्र होऊन नवाबपुर्‍याचे शिवाजीनगर असे नामकरण झाले. मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून र्शीराजराजेश्वर मंदिराचे तत्कालीन ट्रस्टी (कै.) खुशालराव देशपांडे, (कै.) मारोतीसा सावजी, (कै.) शंकरराव भौरदकर, (कै.) महादेव अवचार, (कै.) हरिहर पुराडउपाध्ये, (कै.) गोपाळराव चिने, माधवराव बांडी यांनी र्शावण सोमवारी रस्त्यावर होणारा भंडारा र्शीराजराजेश्वर मंदिराच्या प्रांगणात घेण्याचे सुचवले, शिवभक्तांनीही ते मान्य केले. तेव्हांपासून कावड व भंडार्‍याची प्रथा र्शीराजराजेश्वरात सुरूझाली ती आजवर अविरत सुरू आहे.

हर्र बोला महादेव, वाघोलीचा सहादेव
दरवर्षी अकोला शहरातील शंभरावर लहान-मोठी शिवभक्त मंडळ शेकडो शिवभक्तांच्या साथीने अकोला शहरापासून 15 किलोमीटर अंतरावरील गांधीग्राम (वाघोली) येथून कावडीने पूर्णा नदीचे जल अकोल्यात आणून र्शीराजराजेश्वर, जागृतेश्वर, माणकेश्वर, खोलेश्वर आदी शिवमंदिरात शिवाला जलाभिषेक करतात. या उत्सवाची तयारी चौथ्या र्शावण सोमवारच्या पूर्वसंध्येला रविवारीच सुरू होते. रविवारी सकाळपासून कार्यकर्ते कावडची बांधणी करणे, कुणी भोपळे, कुणी भरणे बांधून कावड सज्ज करतात. यामध्ये दोन भरण्यांच्या कावडीपासून 451 भरणे कावडीत बांधतात. नंतर रविवारी सायंकाळी बस, खासगी वाहन, ट्रक, ट्रॅक्टरने रात्रीस गांधीग्राम येथे पोहोचतात. तेथे रात्री पोहोचल्यानंतर पूर्णा नदीत स्नान करून सहादेवाची पूजाअर्चना करतात. त्यानंतर कावडीत पुर्णा नदीचे जल भरुन अकोल्याच्या दिशेने पायी प्रवासाला सुरुवात होते. ‘हर्र बोला महादेव, वाघोलीचा सहादेव’ असा गजर करीत साईड भोले, साईड भोले करीतच शिवभक्त लगबगीने कावडीचा भार तोलत र्शीराजराजेश्वराच्या दिशेने निघतात. त्यांच्या स्वागतासाठी गांधीग्राम ते अकोला मार्गावर ठिकठिकाणी अनेक भाविक, पक्ष, संघटना, सामाजिक संस्थांच्या वतीने स्वागत कमानी, चहा-फराळ, जेवणाची व्यवस्था असते. महिला रांगोळी काढतात. अनेक ठिकाणी खांद्यांवरील कावडीला विश्राम देण्यासाठी थांबे असतात. पहाटे पाचपासून कावडींचे अकोल्यात आगमन सुरू होते, ते रात्रीपर्यंत सुरूच राहते. वाजत-गाजत, आकर्षक पालखी, देखाव्यांसह शेकडो शिवभक्त व भरण्यांच्या या कावडींचा उत्सव पाहण्यासाठी अकोलेकर आबालवृद्ध मार्गावर गर्दी करतात. त्यांच्या आनंदात सामील होतात.

‘डाबकीरोड’उत्सवाचे आकर्षण
डाबकीरोडवासीयांची कावड उत्सवाचे सन 2009 पासून आकर्षण बनली आहे. शिवभक्तांच्या डाबकीरोडवासीयांतर्फे 451 भरण्यांच्या अजस्त्र कावडीने श्रीराजराजेश्वराला जलाभिषेक होतो. 2003 मध्ये डाबकीरोडवासीयांनी कावडीचा प्रारंभ केला. सुरुवातीला 251 भरण्यांची कावड 2009 मध्ये 451 पर्यंत वाढवली. या कावडीची लांबी 120, रुंदी 16, तर मूर्तीसह उंची 14 फूट इतकी आहे. शिवभक्तांची संख्या अडीच हजारांवर आहे. कावडीसोबत जेवण, टॅंकर, अँम्बुलन्स व इतर वैद्यकीय सेवा, वीज व्यवस्था राहते.’’ संतोष पवार, डाबकीरोडवासी.