आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटीसाठी कसरत; ऑनलाइन नोंदणीसाठी चार झोन कार्यालय, व्यापार्‍यांचा थंड प्रतिसाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - मनपाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू केला असला तरी आता त्याच्या अंमलबजावणीसाठी कसरत करावी लागणार आहे. आजपासून व्यापार्‍यांच्या नोंदणीला प्रारंभ करण्यात आला आहे. मनपाकडून नि:शुल्क नोंदणी अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. व्यापार्‍यांचा त्याला फारसा प्रतिसाद नसून, पहिल्या दिवशी केवळ 16 व्यापार्‍यांनी नोंदणीसाठी अर्ज नेले आहेत.

एलबीटी लागू करण्याची संपूर्ण प्रक्रिया करताना मनपाची दमछाक होत आहे. सर्वप्रथम मनपाला व्हॅट नोंदणीकृत, परवानाधारक व्यापार्‍यांची एलबीटी नोंदणी करावी लागणार आहे. शहरात सुमारे सात हजार व्यापारी आहेत. आगामी काळात शहरात झोननिहाय चार केंद्र व्यापार्‍यांच्या नोंदणीसाठी सुरू करण्यात येतील, अशी माहिती स्थानिक संस्था कर विभागाचे सहायक आयुक्त कैलास पुंडे यांनी दिली. याशिवाय व्यापार्‍यांना सोईस्कर ठरावे म्हणून ऑनलाइन नोंदणीही सुरू करण्यात येणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत सर्व व्यापार्‍यांची नोंदणी करण्याच्या दृष्टीने प्रय} सुरू आहेत. जकातपासून अकोला मनपाला 60 कोटी रुपयांचे उत्पन्न होत होते. स्थानिक संस्था करपासून वर्षाकाठी सुमारे 80 कोटी रुपयांचे उत्पन्न मनपाला अपेक्षित असल्याचे कैलास पुंडे यांनी सांगितले. स्थानिक संस्था कर भरण्यास पात्र असलेल्या कोणत्याही व्यापार्‍यांना नोंदणी प्रमाणपत्राशिवाय अकोला मनपा क्षेत्रात व्यवसाय करता येणार नाही.

एलबीटी जमा होणार 20 पासून
एलबीटीची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरु करण्यात आली असली तरी देखील महापालिकेकडे व्यापार्‍यांची नोंदणी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात मनपाच्या तिजोरीत 20 सप्टेंबरला एलबीटीची रक्कम जमा होणार आहे.

कार्यालयांना नोंदणी आवश्यक
स्थानिय संस्था कर प्रणालीनुसार सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांनाही नोंदणी करणे आवश्यक आहे. अकोला मनपात शासकीय कार्यालयांना नोंदणी करावी लागेल.

अधिकारी, कर्मचारी व व्यापार्‍यांना प्रशिक्षण
एलबीटीवर मार्गदर्शन करण्यासाठी 14 सप्टेंबरला मनपात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत अमरावती येथील विक्रीकर विभागाचे सहआयुक्त व एलबीटीचे जनक महावीर पेंढारी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत मनपाचे अधिकारी, कर्मचार्‍यांसह व्यापार्‍यांनाही सहभागी करून घेणार आहे. या वेळी अधिकारी व कर्मचार्‍यांना एलबीटीचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.