आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Lok Sabha Constituncy News In Marathi, Prakash Ambedkar, Congress

सातपैकी तिघांमध्ये चुरस, मतदार राजा दाबणार कळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला लोकसभा मतदारसंघासाठी एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सातपैकी तिघांमध्ये मुख्य चुरस आहे, अशी चर्चा राजकीय पातळीवर आहे. यापैकी नेमके कोण अकोल्याचे प्रतिनिधित्व लोकसभेत करेल, याचा निर्णय मतदारराजा गुरुवार, 10 एप्रिलला घेणार आहे. मतदान करण्यासाठी मतदारांनी मोठय़ा संख्येत भाग घेण्याची गरज सर्वच पातळीवर व्यक्त करण्यात येत आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे संजय धोत्रे, भारिप-बमसंचे अँड. प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे हिदायत पटेल, बहुजन मुक्ती पार्टीचे शेख हमीद इमाम, आम आदमी पक्षाचे अजयकुमार हिंगणकर, बहुजन समाज पार्टीचे भानुदास कांबळे तर, अपक्ष संदीप वानखडे हे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. तसेच यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत वरीलपैकी एकही उमेदवार नाही या पर्यायाची अर्थात ‘नोटा’ ही कळ मतदारांसाठी उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वांचे लक्ष नोटात किती मते मतदार टाकतात याकडे राहणार आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढत ही भाजप उमेदवार संजय धोत्रे, भारिप-बमसंचे उमेदवार अँड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस उमेदवार हिदायत पटेल यांच्यात होणार आहे. राजकीय विश्लेषकदेखील या तिघांमध्येच मुख्य लढत होणार असल्याचे सांगतात. त्यामुळे या निवडणुकीत मतदारराजा ईव्हीएमवर नेमके कुणाच्या नावासमोरची कळ दाबतो याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष आहे. तरुण मतदारांची यंदा वाढलेली संख्या पाहता या मतदारांचा कौल कुणाला मिळतो, याकडे राजकीय विश्लेषकांबरोबर इतरांचेही लक्ष आहे.
लोकसभा मतदारसंघात या विधानसभा मतदारासंघांचा समावेश : अकोला लोकसभा मतदारसंघात अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तिजापूर तसेच वाशिम जिल्हय़ातील रिसोड मतदारसंघाचा समावेश आहे. रिसोड विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या या निवडणुकीसोबतच विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडेदेखील राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागलेले आहे.