आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला महापौरांचे ‘ना’ राजीनामा नाट्य; मनपाल चर्चेला उधाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- अकोल्याच्या महापौरदेखील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रावण इंगळे होण्याच्या मार्गावर आहेत. गटनेते गजानन गवई यांनी काँग्रेसवर तोफ डागल्यावर भारिप-बमसंमध्ये त्या अनुषंगाने घडामोडी घडल्या. पक्षाने ज्योत्स्ना गवई यांना महापौरपदाचा राजीनामा मागितल्याची आणि त्यांनी यास नकार दिल्याची चर्चा जोरात होती.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सोडण्यास नकार देऊन र्शावण इंगळे यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. इतर पक्षांच्या मदतीने त्यांनी अध्यक्षपद गाजवले होते. महापौर ज्योत्स्ना गवई यांना पक्षाने राजीनामा मागितला; पण त्यांनी राजीनामा दिला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यांनी पक्षादेशाकडे डोळेझाक केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी महापौरांच्या घरी धडक देऊन राजीनामा घेतल्याची चर्चा होती. यासंदर्भात भारिपचे समन्वयक धैर्यवर्धन पुंडकरांनी प्रतिक्रिया दिली नाही. पक्षाने आदेश दिल्यावरही राजीनामा न दिल्याने महापौरांचे पती गौतम गवई यांना पक्षाने काल आणि आज चर्चेसाठी बोलावले होते. पण, त्यांनी चर्चेसाठी जाणे टाळले, त्यामुळे भीमनगरस्थित त्यांच्या घरी पक्षाच्या नेत्यांनी भेट दिली. त्या भेटीतही त्यांनी वरिष्ठांकडे राजीनामा सादर केला नाही. त्यानंतर भारिप-बमसंचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर, आमदार हरिदास भदे, गटनेते गजानन गवई, समन्वयक प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांची एक बैठक येथे झाल्याची माहिती मिळाली आहे.

काँग्रेसचा पुढाकार ?
भारिप-बमसंच्या महापौरांनी राजीनामा द्यावा, यासाठी काँग्रेसच्या नेत्याने पुढाकार घेतल्याची माहिती मिळाली. भारिप-बमसंच्या नेत्यांसोबत काँग्रेसच्या या नेत्याची गाडीत झालेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे. काँग्रेसमधील हा नेता कोण, असा प्रश्न यानिमित्त समोर आला.

पुढील महापौर कोण?
महापौरांचा उत्तराधिकारी कोण, यावर चर्चा रंगली होती. अडीच वर्षांसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी महापौरपद राखीव आहे. आता भारिप-बमसं, काँग्रेसमधील वाद वाढल्याने भारिप सत्तेचा त्याग करेल, अशी शक्यता होती. काँग्रेसजवळ या प्रवर्गातील नगरसेवकच नसल्याने भाजपचा महापौर होण्याची शक्यता आहे. भाजप असा दावा करू शकतो. भाजपच्या करुणा इंगळे यासाठी दावेदार आहे.तसेच अपक्ष नगरसेविका माधुरी मेर्शाम व सुजाता अहिर यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. भारिप-बमसंमध्ये या पदासाठी वैशाली मानवटकर या एकमेव दावेदार आता आहेत.

दोन दिवसातील घडामोडी
बुधवारी सकाळी 7 वाजता महापौर ज्योत्स्ना गवई यांना राजीनामा देण्याची सूचना
बुधवारी दिवसभर महापौरांचे पती गौतम गवई यांच्याशी पक्षनेत्यांचा संपर्क नाही
गुरुवारी दुपारी 3 वाजता शासकीय विर्शामगृहात भारिप-बमसं नेत्यांची बैठक
दुपारी 3.30 वाजता विर्शामगृहातील बैठकीकडे गौतम गवई फिरकले नाहीत
दुपारी 4 वाजता गौतम गवई यांच्या भेटीसाठी भारिप नेते रुग्णालयात
दुपारी 4.30 वाजता गौतम गवई रुग्णालयात नसल्याने त्यांच्या घरी नेत्यांची धडक
सायंकाळी 5 वाजता गौतम गवई यांच्या भेटीनंतर नेते इतरत्र रवाना
सायंकाळी 7 वाजता भारिप-बमसंच्या नेत्यांची अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी बैठक
रात्री 7.30 वाजता भारिप नेत्यांसोबत काँग्रेस नेत्याची अज्ञातस्थळी गाडीत चर्चा
रात्री 8.35 वाजता रेल्वेस्थानकावर काँग्रेस नेत्याशी चर्चा, भारिपचे नेते पुण्याकडे रवाना