आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला : औद्योगिक वसाहत परिसरात गोदामाला लागली आग, एसी, फ्रीजचा कोळसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - औद्योगिक वसाहतीतील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना 31 ऑगस्टला पहाटे घडली. या आगीत गोदामातील वस्तू खाक झाल्या.या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

नेकलेस रोडवरील मित्तल इलेक्टॉनिक्सचे औद्योगिक वसाहतीतील फेज क्रमांक दोनमध्ये गोदाम आहे. या गोदामात विविध नामांकित कंपन्यांचे एसी, फ्रीज, वॉशिंग मशिन्स, एलसीडी टीव्ही ठेवलेले होते. या गोदामला पहाटे 5 वाजताच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच मित्तल कुटंबीय, अग्निशमन दलाचे जवान आणि खदान पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले. आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांना गोदामातील कामगारांनीही मदत केली. सायंकाळपर्यंत आग सुरूच होती. आगीत अंदाजे तीन कोटींचे नुकसान झाल्याची चर्चा घटनास्थळावर होती. मात्र, पंचनामा आणि पाहणी केल्यानंतरच नुकसान किती रुपयांचे झाले, आगीचे नेमके कारण कळणार आहे. आगीची माहिती मिळताच खासदार संजय धोत्रे, भाजपचे नेते आणि नगरसेवक विजय अग्रवाल यांनी घटनास्थळावर धाव घेतली. अग्रवाल यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना सूचनाही दिल्या.


फायर एक्स्टींगविशर निकामी
गोदामच्या बाहेर आग लागल्यानंतर एक फायर एक्स्टींगविशर आढळून आले. या एक्स्टींगविशर रिफिलिंगच्या कालावधीची तारीख नमूद केलेली नव्हती. त्यामुळे फायर एक्स्टींगविशर निकामी होते की कामाचे होते, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

प्रथम हातोडा नंतर जेसीबी
गोदाम चारही बाजूने बंद असल्याने आतमध्ये प्रचंड धूर झाला. त्यामुळे आग विझवण्यात अडथळा निर्माण झाला. अग्निशमन दलाच्या जवानांना गोदामात शिरणे शक्य होत नव्हते. त्यामुळे गोदामची भिंत तोडण्यासाठी हातोड्याचा वापर करण्यात आला. मात्र, भगदाड पाडलेल्या जेसीबीची मदत घेण्यात आली. एकूण सहा ठिकाणी भगदाड पाडण्यात आले.

80 बंब आणि दोन हजार लिटर फोम
ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे 80 बंब रिचवले, आग आटोक्यात आणण्यासाठी 50 कॅनमधील फोमचाही वापर केला. एका कॅनमध्ये 20 लिटर फोम होते. आगीने रौद्ररुप धारण केल्याने अकोट आणि पातूर येथील अग्निशमन दलाचे प्रत्येकी एक बंबही बोलावले.