आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा महासभेमध्ये वादग्रस्त विषयांवर 26 ला होणार चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- महापालिकेची बुधवार 26 फेब्रुवारी रोजी महासभा होणार आहे. या महासभेत घेण्यात येणारे काही विषय वादग्रस्त आहेत. अनेक महिन्यांपासून महासभा न झाल्याने यावर नगरसेवकांमध्ये खडाजंगी होण्याची चिन्हे आतापासून निर्माण झाली आहे. फोर जी, जागावाटप, अग्निशमन व अपंग साहित्य खरेदी, अतिक्रमण, कंत्राटदारांची देयके यावर वाद होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत जात आहे.

शहरातील कचरा उचलण्याचा ठेका हा टनानुसार देण्यासाठी तूर्तास सुरू असलेल्या अमरावतीतील क्षितिज बेरोजगार नागरिक सेवा सहकारी संस्थेला दिलेले कंत्राट रद्द च्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हा वादग्रस्त विषय असून, यात आर्थिक देवाण-घेवाण होण्याची शक्यता राजकीय वतरुळात व्यक्त केली जात आहे. शहरात रिलायन्स कंपनीची फोर जी केबल टाकण्यासाठी नव्या प्रस्तावावर विचार करण्यात येणार आहे. गेल्या वेळी सत्तारूढ भारिप-बमसंने याला विरोध केला होता, आता हाच प्रस्ताव नव्याने आणला जात आहे.

त्याला कुणाचा विरोध होतो व कुणाचा पाठिंबा मिळतो, असा मुद्दा उपस्थित होत आहे. अमरावती येथे भूमिगत केबल टाकण्यावरून वाद सुरू असून, यात भाजपच्या नेत्यांनी कंत्राट घेण्याचा प्रयत्न केला असून, अकोल्यातदेखील तो होण्याची शक्यता आहे. विनानिविदा कापशीतील काळ्या यादीतील संस्थेला मासेमारी करण्यास दिलेली मुदतवाढ रद्दची मागणी समोर आली आहे.अग्निशमन विभागातील निधीचा दुरुपयोग प्रकरणात चौकशीची गरज व्यक्त केली जात आहे. 13 व्या वित्त आयोगातून पडीत वॉर्डात पाच मजुरांना, कंत्राटदारांना प्रलंबित देयके देण्याचा विषय आहे. मालमत्ता व पाणी करवसुली, व्यापारी संकुल गाळे व दुकानाच्या थकित वार्षिक भाडे व भाडेवाढ करण्याबाबत निर्णय होणार आहे. याकडे महापालिका आयुक्तांनी लक्ष देत कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता वाढ करण्याची गरज आता व्यक्त होत आहे. शहरातील अतिक्रमण काढण्याचा अधिकार प्रशासनाचा असून, त्यावर महासभेत चर्चा करण्यात येणार असल्याने अनेक नगरसेवकांनी भुवया उंचावल्या. महापालिका कर्मचार्‍यांच्या बदल्या करणे व 2011 पूर्वीचे देयक महासभेच्या मंजुरीशिवाय अदा करण्यात येवू नयेत, या विषयी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे.

भूमिकेकडे लागले लक्ष
विरोधी पक्षातील भाजप लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्तारूढ भारिप-बमससह काँग्रेसला निवडणुकीपूर्वी होणार्‍या महासभेतील मुद्दय़ावर कसा विरोध करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधातील भाजपची भूमिका मवाळ राहते काय, असा प्रश्न स्वपक्षीय नगरसेवकामध्ये आहे.

सत्तारूढ महाआघाडीतील सदस्यांपैकी काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या पक्षाला पाठिंबा देणार्‍या व भाजपमध्ये प्रवेशीत नगरसेवकांची भूमिका काय राहील, याची चर्चा होती. विजय, सुनीता अग्रवाल, संजय व माधुरी बडोणे यांच्या ‘प्रवेशा’ने सत्तापक्षाला फटका बसतो की, त्यांचे विषय मंजूर होतात, याकडे लक्ष आहे.