आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Akola Municipal Corporation Bharip Bahujan Mahasanga Alon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्तारूढ भारिप-बमसं एकाकी, विषयसूचीवरील ‘फोर जी’चा विषय रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महापालिकेच्या विशेष महासभेतील रिलायन्सद्वारे टाकण्यात येणार्‍या ‘फोर जी’ प्रकरणातील भूमिगत केबल टाकण्याचा विषयपत्रिकेवरील विषय रद्द झाला. तसेच रस्ते अनुदानातून दोन कोटी रुपयांच्या निधीचे झालेल्या वाटपप्रकरणी चौकशी करून निर्णय घेण्यात येईल, असे मत आयुक्तांनी मांडले.

महापालिका क्षेत्रात रिलायन्सला योग्य दरात केबल टाकण्याची परवानगी दिली नाही. या कंपनीसोबत चर्चा करून वाढीव दर मिळावा, या कंत्राटास तात्पुरती स्थगिती देत चर्चा करून निर्णय घेण्याचा विषय होता. हा विषय प्रशासकीय असताना महापौरांनी या विषयावर आज विशेष महासभा आयोजित केली होती. सभागृहात या विषयावर महापौरांनी दोनवेळा निर्णय दिला. पहिल्यांदा हा विषय स्थगित ठेवण्याचा व नंतर चर्चा करून निर्णय घेणे व दुसर्‍यांदा विषयपत्रिकेवरील विषय रद्द करण्याची विरोधकांची आग्रही मागणी मान्य करत विषय रद्द केल्याची घोषणा महापौरांनी सभेत केली. आजच्या दोन्ही विषयाबाबत काँग्रेसची मान्यता नव्हती. उर्वरित. पान 4


भारिप-बमसंची कोंडी झाली होती. सभागृहात मतदानाची मागणी झाल्यानंतर विरोधकांची मागणी ग्राहय़ धरण्यात आली. सत्तापक्षात एकवाक्यता नसणे, सत्तापक्षात सहभागी असलेल्या विजय अग्रवाल यांचा भाजपमध्ये पुनप्र्रवेश, विरोधकांची सभागृहावरील पकड, इतर विषयांवर सत्तापक्षातील घटक पक्षांचे आक्षेप यामुळे भारिप-बमसं कोंडीत सापडला होता. काँग्रेस व भारिप-बमसं येथे आमने-सामने तर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधातील भाजपसोबत असल्याचे चित्र महासभेत होते.


आठवड्यातून दोनवेळ पाणीपुरवठा
महापालिकेत सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मागणीमुळे आज सभागृहात आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला. हा निर्णय पंधरा दिवसानंतर लागू होणार आहे. यासाठी माजी उपमहापौर अजिज अहमद यांनी पुढाकार घेतला. दक्षिण व पूर्व झोन येथे रोज पाणीपुरवठा करणे शक्य आहे तसेच तिसरा पंप सुरू करण्याची गरज शहर अभियंता अजय गुजर यांनी व्यक्त केली. आठवड्यातून दोनदा पाणीपुरवठा करण्यात यश प्राप्त झाल्यास रोज पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

मी कुबेर नाही
रोज पाणीपुरवठा करण्यासाठी आपण कुबेर नसल्याचे आयुक्त दीपक चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितले. तांत्रिकदृष्ट्या रोज पाणीपुरवठा करणे अशक्य आहे तसेच पाणीपट्टीचे 25 टक्के पैसे वसूल होतात. अशा परिस्थितीत रोजचा पाणीपुरवठा अशक्य असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यावर भाजप नगरसेवक प्रतुल हातवळणे यांनी पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी आयुक्तांची असल्याची आठवण करून दिली, तर माजी महापौर काँग्रेस नेते मदन भरगड यांनी जितके दिवस पाणी देता तितका कर घ्या, असा सल्ला दिला. तर भारिप-बमसंच्या नगरसेविका अरुंधती शिरसाट यांनी आयुक्तांच्या भूमिकेचा निषेध केला, तर गजानन गवई यांनी आयुक्तांनी व्यवस्थित बोलण्याचा सल्ला दिला. पाण्याचा हा मुद्दा सभागृहात चांगलाच गाजला होता.

महापौर, उपमहापौरांना भेटा
महापालिकेतील देयक अदा करण्यासाठी व या देयकांवर बजेट मंजूर करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी हे महापौर व उपमहापौरांना भेटण्यास सांगतात. एखाद्या कंत्राटदाराने काम केल्यानंतर त्यास देयक अदा करण्याची जबाबदारी ही महापालिका प्रशासनाची आहे. असे असताना या पदाधिकार्‍यांना कशासाठी भेटायचे, असा प्रश्न शिवसेना नगरसेवक शरद तुरकर यांनी सभागृहात विचारला. दरम्यान, सभागृहात उपमहापौर व आयुक्तांनी काही काळासाठी एकत्रित सभागृह सोडल्याने सभागृहात या विषयाची चांगलीच चर्चा रंगली होती.

आदेशांच्या फैरी
महासभेत शहर अभियंता अजय गुजर व जयप्रकाश मनवर यांना फोर जी प्रकरणात निलंबित करण्याचा आदेश दिला. कर चोरी प्रकरणात मालमत्ता विभागाच्या अधिकार्‍यांची चौकशीची गरज आयुक्तांनी व्यक्त केली. कर विभागाद्वारे या पुनर्मूल्यांकनाचा आदेश त्यांनी दिला. रस्ते व लाइट प्रकरणात दोषींवर चौकशीअंती कारवाई करू, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

कलेक्टरमार्फत चौकशी करू
फोर जी केबलचे जाळे टाकण्यासाठी रिलायन्सला दिलेल्या परवानगीमध्ये चार कोटींचे अनधिकृतपणे वाटप झाले काय, असा प्रश्न गोपी ठाकरे व अजय शर्मा यांनी विचारला. या प्रकरणात मनपाचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला. या विषयावरील भडीमार पाहता महापौर ज्योत्स्ना गवई यांनी कलेक्टरमार्फत चौकशीची घोषणा केली. या वेळी नगरसेवक प्रतुल हातवळणे यांनी महापौरांना तसा अधिकार नसल्याचे सांगितले.

छायाचित्र - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी नगरसेवकांमध्ये अशी खडाजंगी झाली.