आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Municipal Corporation Closed In Second Day

मनपा दुसर्‍या दिवशीही बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - आपल्या विविध मागण्यांसाठी महापालिका कर्मचार्‍यांनी पुकारलेले कामबंद आंदोलन मंगळवारी दुसर्‍या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळे वसुली वगळता महापालिकेचे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. आज सलग दुसर्‍या दिवशी महापालिका कुलूपबंद होती. पाचव्या वेतन आयोगाची थकित रक्कम द्या, सहावा वेतन आयोग लागू करा, चार महिन्यांचे थकित वेतन दसरा व दिवाळीपूर्वी द्या आदी प्रमुख्य मागण्यांसाठी महापालिकेतील सर्व कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कामबंद आंदोलनात महापालिकेतील सुमारे दोन हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. आयुक्त, लेखापरीक्षण, शिक्षण विभाग, मलेरिया विभागातील कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात येत आहे.

मात्र, सफाई कामगार, कार्यालयीन कर्मचार्‍यांना सहावा वेतन आयोग लागू नाही. महापालिकेतील कर्मचार्‍यांना गेल्या चार महिन्यांपासून पगार व निवृत्त कर्मचार्‍यांना पेन्शन नाही. अशा परिस्थितीत कर्मचार्‍यांचा पगार करावा, पाचव्या वेतन आयोगाचे साडेपाच कोटी रुपये कर्मचार्‍यांना द्यावे, सहाव्या वेतन आयोगानुसार महापालिकेतील सर्व कर्मचार्‍यांना पगार लागू करावा आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. दरम्यान, आंदोलन मागे घेण्यासाठी सत्ताधार्‍यांकडून आज कुठलेही प्रयत्न झाले नाहीत. सोमवारी महापौरांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न अयशस्वी झाल्याने आज सत्ताधार्‍यांनी महापालिका कर्मचार्‍यांच्या कामबंद आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याची भूमिका घेतली आहे. आंदोलकांनी महापालिकेचे द्वार कुलूपबंद करून महापालिकेसमोर दिवसभर ठिय्या दिला. सायंकाळी कर्मचारी संघटनेच्या विविध पदाधिकार्‍यांनी द्वारसभा घेऊन कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले. या आंदोलनात सेवानिवृत्त व कार्यरत चार हजार कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला आहे. या वेळी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी विठ्ठल देवकते, कैलास पुंडे, सेवानिवृत्त कर्मचारी संघर्ष समितीचे अध्यक्ष पी. बी. भातकुले, अनुप खरारे, हरी खोडे, शांताराम निधाने, अनिल बिडवे, विजय पारतवार, सुनील इंगळे, नंदकिशोर उजवणे, महादेव सिरसाट, विजय सारवान, धनराज सत्याल, रमेश गोडाले, मदन धनजे, रमेश समद्रे, अमर डिकाव आदींचा समावेश आहे.

आंदोलनाचा फटका नागरिकांना
महापालिकेतील कर्मचार्‍यांच्या आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. मनपातील कामकाज प्रभावित झाले असून, सुमारे 28 विभागांतील कार्य ठप्प झाले आहे. यामध्ये जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, विवाह नोंदणी विभाग, सामान्य प्रशासन विभाग, परवाना विभाग, मलेरिया विभाग, रोखपाल विभाग, कोंडवाडा विभाग, साफसफाई विभाग, दवाखाने वगळून आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आदींचा समावेश आहे.

कर्मचारी वार्‍यावर
महापालिकेतील काँग्रेस व भारिप-बमसं सत्ताधार्‍यांनी कर्मचार्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. भाजप कर्मचार्‍यांच्या न्यायिक हक्कासाठी त्यांच्या मागे गंभीरपणे उभी आहे. शहराचा सत्यानाश करण्यात भारिप व काँग्रेसजन जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे यांनी केला. कर्मचारी संघटनेच्या द्वारसभेत सहभागी होऊन भाजपचा आंदोलनाला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. या वेळी नगरसेवक राजेंद्र गिरी, अजय शर्मा, हरिभाऊ काळे, र्शीकांत लोखंडे, सतीश ढगे, गणेश मानकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरात अस्वच्छता
महापालिका कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे स्वच्छता व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे शहरात अस्वच्छता पसरली आहे.

26 कोटीतून पगार?
महापालिकेला विविध विकास कार्यासाठी प्राप्त 26 कोटी रुपयांच्या विकास निधीतून तात्पुरत्या स्वरूपात मनपा कर्मचार्‍यांचे पगार करण्याची मागणी समोर येत आहे. त्यानंतर शासनाकडून विशेष निधी प्राप्त झाल्यावर तो विकास कार्यावर खर्च केला जाऊ शकतो.

महापालिकेला 50 कोटींचा विशेष निधी द्या : महापालिका कर्मचार्‍यांच्या अधिकार व पगारासाठी 50 कोटी रुपयांचा विशेष निधी देऊन मुख्यमंत्र्यांनी पालकत्व सिद्ध करावे, अशी मागणी आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली आहे. आमदार शर्मा यांनी कर्मचार्‍यांच्या आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी येथे येऊन सभेत पालकत्व घेतले होते. त्यामुळे आता तो शब्द पाळून विशेष निधी देण्याची मागणी आमदार शर्मांनी केली आहे.

मनपा दुसर्‍या दिवशीही बंद
वसुली व अत्यावश्यक सेवा वगळल्या : महापालिकेतील कर्मचार्‍यांच्या कामबंद आंदोलनाचा अत्यावश्यक सेवेवर विपरीत प्रभाव पडू नये म्हणून अत्यावश्यक सेवांना या आंदोलनातून वगळण्यात आले आहे. यामध्ये पाणीपुरवठा, दवाखाने, अग्निशमन आदींचा समावेश आहे. याशिवाय महापालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्याने वसुली विभागालाही आंदोलनातून वगळण्यात आले आहे.

आमदार बाजोरिया घेणार आज मुख्यमंत्र्यांची भेट : मनपा कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे हाल होत आहेत. कर्मचार्‍यांच्या पगारासाठी अकोला मनपाला विशेष निधी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी उद्या आमदार गोपीकिशन बाजोरिया चर्चा करणार आहेत. त्यासाठी आमदार बाजोरिया आज मुंबईला रवाना झाले आहे.

संप लवकरच मिटेल
महापालिकेतील कर्मचार्‍यांचा संप मिटण्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे. कर्मचार्‍यांच्या पगारासाठी शासनाकडे 20 कोटी रुपये मागण्यात आले आहेत. निधी प्राप्त होताच कर्मचार्‍यांचे पगार लवकरच होतील. इतर मागण्यांसंदर्भातही विचार करण्यात येत आहे.’’ डॉ. उत्कर्ष गुटे, प्रभारी आयुक्त, मनपा, अकोला.

आंदोलन तीव्र करू
महापालिकेतील कर्मचार्‍यांवर अन्याय करण्यात येतात. त्यामुळे मनपा कर्मचारी उपेक्षित राहिले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून कर्मचार्‍यांचे वेतन नसल्याने उपासमारीची पाळी आली आहे. कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.’’ विठ्ठल देवकते, पदाधिकारी, कर्मचारी संघटना, अकोला.