आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Municipal Corporation Crushed Poor Women Livelihood

अकोला महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली फोडल्या पणत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - दिवाळीत नागरिकांच्या घरी प्रकाश देणार्‍या पणत्या आज महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली फोडल्या. या घटनेमुळे सर्वसामान्य विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी दिखाऊ कारवाईच्या विरोधात मातृशक्ती 26 ऑक्टोबरला रस्त्यावर उतरली.

मनपाचा गरिबांच्या दिवाळीवर वरवंटा फिरवण्याचा डाव महिलांनी रास्ता रोको आंदोलनातून हाणून पाडला. डॉ. आंबेडकर खुले नाट्यगृहाजवळ महिला रस्त्यावरच झोपल्या. महिलांच्या रौद्ररूपापुढे मनपा आणि पोलिसांनी लोटांगण घालत अतिक्रमणविरोधी कारवाई गुंडाळली. आंदोलनामुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. मनपाच्या ‘आंधळी’ कारवाईविरुद्ध महिलांनी पुकारलेल्या आंदोलनात भाजपच्या नेत्यांनी उडी घेतली.


महिलांचे आंदोलन
मनपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाजवळ पणती आणि इतर साहित्याच्या दुकानांवर बुलडोजर चालवला. या कारवाईत पणतीसह इतरही मातीच्या साहित्यांचे नुकसान झाले. चार दिवस पोटासाठी दुकान लावणार्‍या महिलांना आपले संसार धोक्यात आल्याचे दिसताच त्या आक्रमक झाल्या. महिलांनी रस्त्यावर झोपून आंदोलन सुरू केले. एरवी रस्त्यावर बसून केलेले आंदोलन नागरिकांनी पाहिले होते. मात्र, महिला भररस्त्यात झोपलेल्या पाहून वाहनचालकही जागेवरच थांबले. या वेळी महिलांनी मनपाच्या आततायी कारवाईच्या विरोधात घोषणाही दिल्या.