आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Akola Municipal Corporation Doesn't Use 123 Crores

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला मनपाच्या तिजोरीत नियोजनाअभावी 123 कोटी पडूनच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहराची भकास परिस्थिती पाहता अकोला महापालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत डबघाईस आल्याचे तुम्हाला वाटेल. पण, मुळात तसे नाहीच. महापालिकेच्या तिजोरीत आजच्या तारखेत तब्बल 123 कोटी रुपये शिल्लक आहेत. हा सर्व निधी शहराच्या विकासासाठी आला असून योग्य नियोजनाअभावी तो तसाच पडून आहे.

महापालिकेला भूमिगत गटार योजनेसाठी केंद्र सरकारने 50 कोटी रुपये दिले होते. याच योजनेसाठी राज्य शासनानेही 6 कोटी रुपये दिले आहेत. हे 56 कोटी रुपये महापालिकेने बँकेत ठेवींच्या स्वरुपात ठेवले आहेत. त्यावर सुमारे सात कोटी रुपयांचे व्याज महापालिकेला प्राप्त झाले आहेत. सदर योजना नव्याने या महिन्यात मार्गी लागली. अलिकडेच शासनाने शहर विकास कामांसाठी 26 कोटी रुपये मनपाला दिले. ते अद्याप नियोजनाअभावी खर्च झालेले नाहीत. सत्तापक्ष आणि विरोधकात या निधीवरुन जोरदार वाद पेटला आहे. आयएचएसडीपी या गरिबांच्या घरकुल योजनेसाठीचे 18 कोटी रुपयेही असेच मनपा तिजोरीत पडून आहेत. तेराव्या वित्त आयोगातून महापालिकेला अडीच कोटी रुपये, नगरोत्थान योजनेंतर्गत सव्वा दोन कोटी रुपये, दलितेतर भागांच्या विकासासाठी सव्वा तीन कोटी रुपये आणि नुकतेच एका खाजगी कंपनीने भूमिगत फायबर ऑप्टीकलचे जाळे उभारण्यासाठी सव्वा आठ कोटी रुपये मनपाला दिले. असे एकूण 123 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत पडून आहेत.

शहरात खड्डय़ांमधून रस्ता शोधावा लागतो, बंद पथदिवे, अशुध्द व अनियमित पाणी पुरवठय़ाने नागरिक आजारी, कचरा व साफसफाई होत नसल्याने शहरात घाणच घाण अशा अनेक प्राथमिक तक्रारी आजही कायम आहेत. विकास कामांसाठी 123 कोटींचा निधी असताना तो खर्च करण्यात येथील प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यातील समन्वय अधोरेखित करतो. या सर्व निधीचे योग्य नियोजन केल्यास शहराची स्थिती पूर्णत: बदलणे शक्य आहे. पण, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व प्रशासनात ठोस धोरणांची कमतरता यामुळे या निधी अखर्चित असल्याचे स्पष्ट होते.