आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Municipal Corporation Encrochment Team Return

अतिक्रमण ‘जैसे थे’, पथक कारवाईविना माघारी फिरले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहराच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजारातील गजानन मार्केटचे अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमणविरोधी विभागाचे 12 डिसेंबरला गेलेले पथक सायंकाळी खाली हातच परत फिरले. कारवाई थांबवण्यात अतिक्रमणकर्त्यांना यश आल्याची चर्चा परिसरात होती.
जुना कापड बाजार परिसरात गजानन मार्केटमध्ये सिंधी समाजासाठी असलेल्या कोट्यवधींच्या खुल्या जागेवर अतिक्रमण करून रातोरात चार दुकाने उभारण्यात आली. नझुल शिट नं. 27 सी. नझुल प्लॉट नं. 60 मधील 10 बाय 30 तीनशे चौरस फूट जागा स्थायी समिती सभापतींनी 11 फेब्रुवारी 2013 ला वेळेवर येणार्‍या विषयात खुली जागा भाडेपट्टय़ावर देण्याचा ठराव पारित केला आहे. हा ठराव नियमबाह्य व वादग्रस्त असल्याचे समोर आले आहे. या जागेवर बांधलेले चार दुकानांचे अतिक्रमण असल्याचे समोर आले. हे अतिक्रमण 24 तासात काढण्याची नोटीस आयुक्तांनी अतिक्रमितांना दिली होती. मात्र, अतिक्रमण ‘जैसे थे’ असल्याने गुरुवारी अतिक्रमण विभागाचे प्रमुख विष्णू डोंगरे पथकासह सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास अतिक्रमण काढण्यासाठी जेसीबी मशीनसह गजानन मार्केटमध्ये दाखल झाले. अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यापूर्वीच अनधिकृत बांधकामधारक मो. जावेद हाजी निजामोद्दीन तेली यांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांना कागदपत्रे दाखवली. त्यामुळे अतिक्रमण विभागाने कारवाई न करता परत महापालिकेची वाट पकडली. नेमकी कुठली कागदपत्रे दाखवल्यामुळे अतिक्रमण काढण्याचे पथकाने टाळले, याबाबतची उलट सुलट चर्चा परिसरात रंगली.
चहा घेऊन पथक माघारी
अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकाने अतिक्रमणधारकांसोबतच चहा घेऊन आपली परतीची वाट पकडली. या प्रकरणात मोठी ‘अर्थ’पूर्ण तडजोड झाल्याची चर्चा परिसरात होती.
पोलिस बंदोबस्त
अतिक्रमण विभागाच्या पथकाने अतिक्रमण काढण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त सोबत नेला होता. गजानन मार्केटमधील अतिक्रमण काढताना सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून मनपाच्या सुरक्षा रक्षकांसह पोलिसांचा मोठा ताफा गजानन मार्केटमध्ये उपस्थित होता.
विरोधकांचा खटाटोप
पथकाची कारवाई थांबवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी खटाटोप केल्याची माहिती आहे. या अतिक्रमणात भाजपच्या एका नगरसेवकाचा ‘हात’ असल्याची माहिती आहे. त्यामुळे तत्कालीन स्थायी समिती सभापती व आताचे भाजप नगरसेवक यांनी स्थायी समितीच्या बैठकीत ठराव पास करून घेतला होता. कारवाई टाळण्यासाठीदेखील त्यांनी प्रयत्न केल्याची माहिती आहे.
कारण स्पष्ट करू शकत नाही
गजानन मार्केटचे अतिक्रमण काढण्यासाठी पथक गेले होते. मात्र, काही कारणामुळे अतिक्रमण पथक अतिक्रमण न काढता परत आले आहे. अतिक्रमण न काढण्याचे कारण स्पष्ट करू शकत नाही.’’ विष्णू डोंगरे, प्रमुख, अतिक्रमण विभाग, मनपा, अकोला