आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Municipal Corporation GB Issue BJP Blame Bharip

प्रलंबित प्रकरणी मनपाने सभेत घेतला बोगस ठराव, भाजप नेत्यांचा आरोप; प्रभारी आयुक्तांना घेराव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या एका प्रकरणात महापालिका महासभेत बोगस ठराव घेत शिक्षकांची नियुक्ती केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी शुक्रवार, 6 डिसेंबरला केला. प्रभारी आयुक्तांना घेराव घालत भाजपने आज या प्रकरणात शहर कोतवाली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण पोलिसांनी चौकशीत ठेवले आहे. दरम्यान, भाजपच्या या आरोपांबाबत भारिप-बमसंच्या वरिष्ठ नेत्यांनी कानावर हात ठेवले आहे, तर हे प्रकरण गंभीर असून, या प्रकरणात दोषींवर कारवाईची गरज भारिप-बमसं नेत्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणात 16 शिक्षकांची नियुक्ती करण्याचा आदेश निवड समितीने दिला होता. पण, नऊ शिक्षकांचा आदेश देण्यात आला नव्हता तसेच हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असताना त्यावर महापालिका सर्वसाधारण सभेत वेळेवरचा विषय घेत हा बोगस ठराव घेण्यात आला, असा आरोप भाजप शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे यांनी व्यक्त केला. या वेळी माजी नगरसेवक सागर शेगोकार यांनी महापालिकेत अतिरिक्त शिक्षक असताना हे शिक्षक नियमित कसे केले, असा प्रश्न केला, तर नगरसेवक सतीश ढगे यांनी पंधरा लाखांचा व्यवहार झाल्याचा आरोप करताच शिक्षण विभागाचे नियंत्रण अधिकारी अनिल बिडवे यांनी त्यास नकार दिला. भाजपच्या आंदोलनात नगरसेवक अजय शर्मा, सतीश ढगे, बाळ टाले, राहुल देशमुख, विजय इंगळे, धनंजय गिरीधर आदींचा समावेश होता.
कोण आहेत सूचक, अनुमोदक ? : या प्रकरणात सूचक आणि अनुमोदक भारिप-बमसंचे नगरसेवक आहेत. गटनेते गजानन गवई सूचक असून, अनुमोदक मंगला घाटोळे आहेत. दरम्यान, विरोधकांनी वेळेवरच्या ठरावात असा ठराव झाला नसल्याचे सांगत या प्रकरणाची सीडी तपासण्याची गरज पोलिस तक्रारीत व्यक्त केली आहे.
ठरावात एक नाव वाढले : कार्यालयीन टिप्पणीत नसलेले एक नाव वेळेवरच्या विषयाच्या ठरावात टाकण्यात आले आहे. टिप्पणीत 30, तर ठरावाच्या विषयावर 31 शिक्षकांची नावे आहेत. यात कविता सोनावणे या शिक्षिकेचे नाव अतिरिक्त असल्याची माहिती मिळाली. वेळेवरच्या विषयात एक नाव अधिक कसे, तसेच या टिप्पणीवर प्रभारी आयुक्तांची स्वाक्षरी कशी, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

महापालिकेत भ्रष्ट सरकार
अकोला महापालिकेत काही पण होऊ शकते, अधिकार्‍यांना कल्पना असताना न्यायप्रविष्ट प्रकरणात ठराव घेत मोठा मलिदा लाटण्यात आला आहे. हे सर्व बोगस ठराव वेळेवरच्या विषयात घेण्यात येतात, हे ठरावच महापालिकेत होत नाही. या सर्व प्रकरणांत पोलिसांनी चौकशी करत अधिकारी आणि पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावे. डॉ. अशोक ओळंबे, महानगराध्यक्ष, भाजप.
अनियमितता झाली असेल तर कारवाई करू
या सर्व प्रकरणात अनियमितता झाली असेल, तर निश्चित कठोर कारवाई करण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत कुणालाच पाठीशी घालणार नाही. प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, समन्वयक, भारिप-बमसं.