आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला महापालिका अभियंत्याला जिल्हा कचेरीत मारहाण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- महापालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता राजेंद्र टापरे यांना आज महापालिका अपक्ष नगरसेवक गोपी ठाकरे यांनी मारहाण केली. ही मारहाण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नगररचना विभागात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यानंतर बराच गदारोळ व धावपळ घटनास्थळी झाली. राजेंद्र टापरेंचा मोबाइल नगरसेवकाच्या ताब्यात व तो बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

गोरक्षणरोडवरील कीर्तीनगरातील रस्त्यावरील अवैध बांधकामाच्या विरोधातील तक्रारीवरून ही मारहाण झाल्याची माहिती मिळाली. राजेंद्र टापरे हे कार्यालयीन कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नगररचना विभागात गेले होते. त्या वेळी सायंकाळी 5 ते 5.30 या वेळेत तेथे गेलेले अपक्ष नगरसेवक गोपी ठाकरे यांच्याशी त्यांचा वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या गोपी ठाकरे यांनी थेट राजेंद्र टापरे यांना मारहाण केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दरम्यान, मनपाचे प्रभारी आयुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

लेखी तक्रार नाही
नगररचना विभागाकडे कीर्तीनगर परिसरातील बांधकामाची कोणतीही रीतसर तक्रार नाही हेच बांधकाम बंद पाडण्याकरिता गोपी ठाकरे यांचे प्रयत्न काही दिवसांपासून सुरू आहेत. नगररचनाकार विभागातील राजेंद्र टापरे यांनी ठाकरे यांना आपल्याकडे तक्रार नसताना ते बांधकाम कसे पाडणार, असा सवाल केला. ठाकरे यांनी नगररचना विभागाकडे रीतसर तक्रार द्यावी, यानंतर अवैध बांधकाम पाडण्यासाठी पुढाकार घेऊ, असे टापरे यांनी ठाकरे यांना म्हटल्यानंतर ठाकरे यांचा पुन्हा पारा चढला आणि टापरे यांना ठाकरे यांनी मारहाण केली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.


मोबाइलने वाद वाढला
मोबाइल हरवल्याचा आयडिया कंपनीत व पोलिसात रिपोर्ट करतो, असे कनिष्ठ अभियंता राजेंद्र टापरे यांनी म्हणताच वाद वाढला. त्यानंतर टापरे यांनी थेट मोबाइल सिमकार्ड बंद करण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती मिळाली. या विषयावरून हा वाद विकोपाला गेल्याचे सांगण्यात येते.

स्वाभिमान दुखावल्याची चर्चा
गोपी ठाकरे यांनी प्रभागातील अवैध बांधकाम पाडण्यासंदर्भांत महापालिकेच्या नगरचना विभागाकडे कोणतीही कायदेशीर तक्रार केली नाही. आधी तक्रार करा नंतर बांधकाम अवैध आहे की नाही, ते चौकशीअंती पाडण्यात येईल, असे नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता राजेंद्र टापरे यांनी नगरसेवक गोपी ठाकरे अवगत केले. एका लोकप्रतिनिधीच्या तोंडी आदेशाला सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे केवळ ठाकरे यांचा स्वाभिमान दुखावला गेला व त्यामुळे त्यांनी हे कृत्य केल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालया परिसरात दबक्या आवाजात होती.

घटनेला वादाची किनार
महापालिकेतील अपक्ष नगरसेवक गोपी ठाकरे यांनी गोरक्षण रोडवरील कीर्तीनगरातील किशोर अग्रवाल यांच्या बांधकामाची तक्रार नगररचना विभागात केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अग्रवाल यांचे बांधकाम कीर्तीनगरात सुरू आहे. याआधी रस्त्याचा वाददेखील सुरू होता. त्यांचे काहीही कारण नसताना अतिक्रमण पाडण्यात आले होते. याविरोधात अग्रवाल यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. यानंतरही ठाकरे यांनी याबाबत तोंडी तक्रार करण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे, असा आरोप होत आहे.

राजेंद्र टापरे यांच्याशी माझा वाद झाला नाही. त्यामुळे त्यांना मारहाण करण्याचा विषयच नाही. अभियंता टापरे हे माझ्या झोनमध्ये काम करत नाहीत. केवळ कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांचा माझा नमस्कार झाला. त्यानंतर मी तिथून निघून गेलो. माझ्याकडे त्यांचा मोबाइल नाही.
- गोपी ठाकरे, अपक्ष नगरसेवक, महापालिका.