आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Municipal Corporation LBT And Traders Issue

मनपामध्ये व्यापार्‍यांचे आजपासून ‘हाजीर हो’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- स्थानिक संस्था कर (एलबीटी) नोंदणीशिवाय मनपा क्षेत्रात व्यवसाय करणार्‍या 60 व्यापार्‍यांना मनपाच्या एलबीटी विभागाने नोटीस बजावली आहे. या व्यापार्‍यांची उद्या, 5 डिसेंबरपासून एलबीटी विभागात सुनावणी होणार असून, दोषी आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
सप्टेंबरपासून मनपा क्षेत्रात एलबीटी लागू झाला आहे. या क्षेत्रात व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍याला एलबीटीमध्ये नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी न करता व्यवसाय केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार मनपाला आहेत. त्यानुसार चार झोनमधील 60 व्यापार्‍यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार 5 डिसेंबरपासून व्यापार्‍यांची सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये व्यापार्‍यांवर होणार्‍या कारवाईपूर्वी त्यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. या सुनावणीत व्यापारी दोषी आढळल्यास त्या व्यापार्‍यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. विनाएलबीटी नोंदणी व्यवसाय करणार्‍या शहरातील व्यापार्‍यांचा एलबीटी विभागाकडून शोध घेण्यात येत असून, तसे आढळल्यास नोटीस बजावण्यात येत आहे. मनपाच्याच्या चार झोनमध्ये ही मोहीम सुरू आहे.
याशिवाय नोंदणीकृत व्यापार्‍यांना एलबीटी नोंदणीचे प्रमाणपत्र मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. हे प्रमाणपत्र व्यवसायाच्या ठिकाणी लावणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक व्यापार्‍यांनी हे प्रमाणपत्र व्यवसायाच्या ठिकाणी लावले नसल्याचे उघडकीस आले आहे. अशा व्यापार्‍यांवरदेखील एलबीटी विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. व्यापार्‍यांवर कारवाईसाठी उपायुक्त, एलबीटी अधिकारी, निरीक्षकांचा समावेश असलेले पथक गठित केले आहे. याशिवाय झोननिहाय एलबीटी अधिकारी तपासणी करत आहेत. दरम्यान शहरातील पाच हजार 332 व्यापार्‍यांनी एलबीटी नोंदणी केली आहे. त्यापैकी तीन हजार 900 व्यापारी व्हॅट नोंदणीकृत आहेत.
विनानोंदणी व्यवसाय नाही
व्यापार्‍यांनी एलबीटी नोंदणीशिवाय शहरात व्यवसाय करू नये. व्यापार्‍यांनी नियमानुसार नोंदणी करून कागदपत्रे ठेवावी. याशिवाय व्यापार्‍यांनी वेळेत एलबीटी भरून अप्रिय कारवाई टाळावी.
- कैलास पुंडे, प्रमुख, एलबीटी विभाग