आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या आयुक्तांच्या आगमनाने कामकाजाला लागली शिस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - डॉ. महेंद्र कल्याणकर महापालिकेत आयुक्तपदी सोमवारी रुजू झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी येथील कामकाजास शिस्त लागल्याचे निदर्शनास आले. सकाळी 10 वाजतापूर्वीच कार्यालयात दाखल होऊन कर्मचार्‍यांनी काम सुरू केले. महापालिकेच्या झोन कार्यालयांची स्थिती मात्र ‘जैसे थे’ होती. मालमत्ता कर विभागाची वसुली सोमवारी दोन लाखांनी वाढून ती 12 लाखांवर गेली. नव्या आयुक्तांमुळे महापालिकेत सकारात्मक बदल दिसला. मागील पाच महिन्यांपासून आयुक्त नसल्याने महापालिकेचा कारभार प्रभारी आयुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांच्याकडे होता. डॉ. उत्कर्ष गुटे महापालिकेच्या मुख्य इमारतीऐवजी हुतात्मा स्मारक येथे किंवा एखाद्या झोन कार्यालयात दिसायचे. मात्र, सर्व वरिष्ठ अधिकारी मंगळवारी सकाळपासूनच महापालिकेच्या मुख्य इमारतीत हजर होते.

नगरसेवक दूरच
नेहमी येणारे नगरसेवक मंगळवारी महापालिकेत फिरकलेच नाहीत. नवे आयुक्त कर्तव्यकठोर असल्याने नगरसेवकांनी महापालिकेकडे पाठ फिरवल्याची माहिती मिळाली. आयुक्तांनी आपली अनधिकृत बिले काढली, तर उगाच कशाला असे म्हणून काहींनी महापालिकेत येणे टाळले.

हौसे गायब : महापालिका आयुक्तांनी लाच मागणार्‍या कर्मचार्‍यांची तक्रार थेट ‘एसीबी’कडे करण्याची सूचना नागरिकांना केल्याने काल दिसलेले हौसे-नवसे मंगळवारी महापालिकेत आलेच नाही. महापालिकेपासून दूर राहणेच त्यांनी योग्य समजले. त्यामुळे केवळ काम असलेलेच लोकं महापालिकेत आले होते. काहींनी आयुक्तांचे स्वागत करून अकोल्यात सकारात्मक कामे व्हावीत यासाठी शुभेच्छा दिल्या.

मालमत्ता करवसुलीत वृद्धी : मालमत्ता करवसुली विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी चांगलीच धास्ती घेतली. त्यांनी थेट वसुली मोहीम हाती घेतली आहे. मालमत्ता करवसुली विभागास 25 कोटींची वसुली शक्य आहे. यासाठी आयुक्तांनी कठोर भूमिका घेऊन प्रत्येक कर लिपिकास वसुलीचे लक्ष्य देण्याची गरज आहे, असे मत या क्षेत्रातील जाणकाराने व्यक्त केले. ज्या कर्मचार्‍यांना इतर विभागात काम नाही, त्यांनादेखील कामास लावल्यास लक्ष्यप्राप्ती शक्य असल्याचे या जाणकाराने स्पष्ट केले.

पडीत वॉर्डांची चौकशी करावी : महापालिका कर्मचार्‍यांच्या संपादरम्यान कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी पडीत वॉर्डातील भ्रष्टाचाराबाबत आरोप केला होता. त्यामुळे पडीत वॉर्डातील साफसफाईची व तिथे असलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांची आकस्मिक पाहणी व मोजणी आयुक्तांनी करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेच्या एका नेत्याने नाव जाहीर न करण्याची विनंती करत केली. नवनियुक्त आयुक्तांना यात मोठे घबाड हाती लागेल, असा विश्वास या नेत्याने व्यक्त केला.

कंत्राटदार हताश : महापालिकेत मनमानी पद्धतीने काम करणारे कंत्राटदार हताश झाले आहेत. नवनियुक्त आयुक्त नियमबाह्य कामांना थाराच देणार नाही, याची जाणीव झाल्यामुळे या कं त्राटदारांच्या चेहर्‍यावरचे हास्य पळाले. महापालिकेतून त्यांना गाशा गुंडाळावा लागेल, असे संकेत प्राप्त झाले आहेत. महापालिका परिसरातून काही कंत्राटदारांनी काढता पाय घेतला. काम न करता बिल लाटणारे हे कंत्राटदार होते, अशी माहिती मिळाली.

नागरी सुविधा केंद्र बंद : तांत्रिक कामानिमित्त मंगळवारपासून नागरी सुविधा केंद्र बंद आहे. मात्र, त्याची सूचना महापालिका प्रशासनाने दिली नाही. त्यामुळे जन्म व मृत्यूची नोंद व दाखले घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. त्यामुळे थेट आता गुरुवार, 20 फेब्रुवारी रोजी हे सुविधा केंद्र कार्यान्वित होणार आहे. सुटीच्या दिवसात हे नागरी सुविधा केंद्र बंद ठेवत संगणकांचा डाटा अपडेट करणे शक्य झाले असते, अशी माहिती समोर आली आहे.