आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Municipal Corporation News In Marathi, Cleark, Crime, Divya Marathi

महापालिकेच्या लिपिकानेच थांबवला कोट्यवधींचा कर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरातील बड्या व्यक्तींच्या नावाचा समावेश असलेल्या सहकारी बँका, महाविद्यालय तसेच डॉक्टर, बिल्डर, विधिज्ञ, व्यापारी, प्राध्यापक, राजकारणी, वृत्तपत्रांच्या मालकांच्या घरांचा व दुकानांचा कोट्यवधीचा कर गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या एका लिपिकामुळे वसूलच झाला नाही. या महिन्यात महापालिकेच्या पथकाने लिपिकाच्या कपाटाची दारे उघडली आणि कोट्यवधीच्या थकित कराची माहिती उघड झाली. या प्रकरणातील चौकशी अहवालात संबंधिंतांवर ताशेरे ओढले असले तरी कुठलीही प्रशासकीय कारवाई अद्याप झाली नाही. महापालिकेच्या विशेष पथकाने 8 मार्च रोजी पाहणी केली. या टेबल पाहणीत लिपिक श्याम गाडे यांच्या कपाटातून करमूल्यांकन झालेल्या, पण प्रत्यक्षात करवसुली होत नसलेल्या मालमत्तांच्या 300 फायली मिळाल्या. हे प्रकरण उघड झाले, तेव्हा याची व्याप्ती कुणाच्या लक्षात आली नाही. पण, या प्रकरणाचा तपास अधिकार्‍यांनी अभ्यास केल्यावर या सर्व प्रकरणात महापालिकेचा कोट्यवधीचा कर थकित असल्याचे मात्र उघड झाले आहे. त्यामुळे महापालिकेचे गेल्या अनेक वर्षांच्या उत्पन्नात घट झाल्याचे वास्तव या तपासणीत आढळले.


फायली कपाटात कशा : फायली कपाटबंद कशा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या फायलींची पाहणी का केली नाही तसेच करवसुलीत घट झाल्याने या सर्व प्रकरणात संबंधिताने महापालिकेचे जाणीवपूर्वक आर्थिक नुकसान केले. त्याच्यावर दंडात्मक व प्रशासकीय कारवाईची गरज आता व्यक्त केली जात आहे.


भरारी पथक आवश्यक
महापालिकेत होणारी अनियमितता पाहता अशाप्रकारे भरारी पथकाद्वारे तपासणी करत वचक निर्माण करण्याची गरज आहे. हे प्रकरण उघडकीस आल्याने मालमत्ता कर विभागात थोडीबहूत शिस्त लागली आहे. पण, इतर विभागातील अनागोंदी पाहता तिथेदेखील अशी तपासणी होण्याची गरज आहे. स्थानिक संस्था कर विभागात अशी पाहणी आवश्यक असल्याचे मत सूत्रांनी व्यक्त केले.


चौकशी सुरू, कारवाई करू
या प्रकरणात संबंधिंत लिपिकाला कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. त्याचे मत जाणून घेण्यात येत आहे. पण, प्रकरण गंभीर आहे. महापालिकेचा कोट्यवधीचा महसूल वसूल केला नाही. या प्रकरणात संबंधिंत लिपिकावर कडक कारवाई करू. आमची चौकशी पूर्ण होत आहे. थकित कराची वसुली करण्यात येईल. दोषींवर कडक कारवाई करणार आहे.’’ - डॉ. उत्कर्ष गुटे, उपायुक्त, महापालिका, अकोला.