आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Municipal Corporation News In Marathi, Illegal Construction, Divya Marathi

शहरातील अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिका चालवणार हातोडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत व नियमबाहय़ बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे. यात अपार्टमेंट, व्यापारी संकुल, घरांची माहिती गोळा करणे सुरू झाले आहे. या मोहिमेत अनधिकृत व अतिक्रमण झालेल्या बांधकामांवर कारवाई करण्यात येईल. यासंबंधी महापालिका नगर रचना विभागाने काम सुरू केले असून, नागरिकांच्या सोयीसाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.


शहरात होणारे अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी महापालिका मोहीम राबवणार आहे. या मोहिमेत शहरातील पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण झोनमधील अनधिकृत व अतिक्रमित बांधकामे नोंदवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच ज्या बांधकाम व्यावसायिकांनी नियमबाहय़पणे मंजूर चटई क्षेत्रापेक्षा (एफएसआय) अधिकचे बांधकाम केले त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत अनधिकृत व अतिक्रमित अतिरिक्त बांधकाम पाडणे व नियमानुसार दंडाची रक्कम वसूल करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. यासंबंधी महापालिका प्रशासनाला सुमारे एक हजार प्रकरणे आढळली आहेत.


तूर्तास निर्माणाधीन बांधकामावर नजर
महापालिका क्षेत्रात निर्माणाधीन बांधकामांवर आज महापालिकेने नजर केंद्रित केली. ही बांधकामे करणार्‍यांना आज बांधकाम थांबवण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच ज्या ठिकाणी अनधिकृतपणे व अतिरिक्त बांधकाम सुरू आहे, अशा सर्व अपार्टमेंटवर ही कारवाई होणार आहे. या कारवाईचा धसका बांधकाम व्यावसायिकांनी घेतला आहे.


मंजूर नकाशापेक्षा बांधकाम जास्तच
मंजूर नकाशा आणि चटई क्षेत्रापेक्षा अधिकचे बांधकाम करण्यात येथील काही बांधकाम व्यावसायिक अग्रेसर आहेत. अशा अपार्टमेंट व व्यापारी संकुलांचे किती बांधकाम अनधिकृत आहे, याची तपासणी करत संबंधितांवर दंडात्मक कारवाईची गरज आहे. ते अनधिकृत बांधकामे सार्वजनिक वाहतुकीस, सर्व्हिस लाइन, शेजार्‍यांचे हक्क बाधित करत असतील, तर त्यांना पाडण्याची गरज आहे.

वाहनतळाच्या जागेतील बांधकामांचे काय? : महापालिका हद्दीत मोठय़ा प्रमाणात अपार्टमेंट व व्यापारी संकुलात वाहनतळाच्या जागेत बांधकाम केले जात आहे. यासंबंधीच्या तक्रारी सदनिकाधारकांनी व दुकानदारांनी केल्या आहेत. काही बांधकाम व्यावसायिक कारवाई टाळण्यासाठी प्रशासनाशी साटेलोटे करण्याची शक्यता आहे. अशा व्यावसायिकावर पहिले कारवाई करण्याची गरज आहे. वाहनतळाच्या जागेवर घर व दुकाने उभारणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.