आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Municipal Corporation Planing Water For Summer Season

उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर अखेर कृती आराखडा तयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने उन्हाळ्यातील पाणीटंचाई उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला असून, जिल्हाधिकार्‍यांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत जिल्हय़ातील 52 गावे पाणीटंचाई उपाययोजनांकरिता प्रस्तावित असून, 1 कोटी 36 लाख 90 हजार खर्च अपेक्षित आहे.

जानेवारी संपत आला, तरी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कृती आराखडा तयार करून जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला नव्हता. त्यामुळे जिल्हा प्रशासन हा अहवाल मंजुरी व अनुदानासाठी राज्य शासनाकडे पाठवू शकत नव्हते. अखेर 20 जानेवारीला पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई उपाययोजनांची यादी (कृती आराखडा) तयार करून मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केली. यामध्ये अकोट, बार्शिटाकळी, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, अकोट आणि तेल्हारा तालुक्यातील एकूण 52 गावे पाणीटंचाईसाठी प्रस्तावित केली आहेत. हा कृती आराखडा जानेवारी ते मार्च या कालावधीसाठी र्मयादित असून, याअंतर्गत या गावांमध्ये बुडक्या घेणे, विहिरी खोल करणे, गाळ काढणे, आदी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.

पाणीटंचाई उपाययोजनांच्या गावांची यादी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केली आहे. जिल्हय़ातील सात तालुक्यांतील एकूण 52 गावांमध्ये पर्यायी उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी एकूण 1 कोटी 36 लाख 90 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. हा अहवाल व खर्चास मंजुरीकरिता जिल्हाधिकार्‍यांकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने प्रस्ताव सादर केला आहे.

प्रशासनाने घेतली दखल
‘दिव्य मराठी’ने 18 जानेवारीच्या अंकात ‘जानेवारी अर्धा होऊनही कृती आराखडा नाही’ या शीर्षकांतर्गत वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची प्रशासनाने दखल घेत या उपाययोजना करण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे.

दृष्टिक्षेपात नियोजन
तालुका गावे एकूण खर्च (लाखांत)
अकोला 32 89.30
अकोट 13 29.50
तेल्हारा 7 18.10
एकूण 52 136.90

जिल्हय़ातील पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या मंजुरीनंतर हा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येईल. अनुदान प्राप्तीनंतर तत्काळ संबंधित उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात येईल.’’ व्ही. एम. सरकटे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि. प. अकोला.