आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला शहराची लोकसंख्या पोहोचली सात लाखांवर, दररोज पाण्यासाठी हवेत 16 कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शहरातील पाणीपुरवठा करण्यासाठी दरवर्षी आठ कोटी रुपये महापालिकेकडून खर्च करण्यात येतो. मात्र, असे असतानाही नागरिकांना चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणात पाणी असल्यामुळे रोज पाणीपुरवठा करण्याची गरज आहे. मात्र, अभियंता व कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळे रोज पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. रोज पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला 16 कोटी रुपयांची गरज आहे.

2011 च्या जनगणनेनुसार शहरातील लोकसंख्या सात लाखांवर आहे. पण, महापालिकेच्या लेखी साडेचार लाख नागरिकांना पाणीपुरवठा होतो. अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा करणार्‍या पाइपलाइन्स व जलकुंभांचे नूतनीकरणासाठी महापालिका उदासीन आहे. त्यामुळे नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात महापालिका अपयशी ठरत आहे. सध्या महापालिका पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करत आहे. अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे तीन ते चार अतिरिक्त जलकुंभ उभारण्यास अडचण येत आहे.

व्यावसायिक भरतात घरगुती कर
शहरातील अनेक व्यावसायिक हे घरगुती पाणीपट्टी अदा करतात. त्यामुळे पाणी पट्टीची वसुली ही तोकडी होते. व्यावसायिकांकडून व्यावसायिक दरात पाणीपट्टी वसुल करण्याची गरज आहे. तरच, महापालिकेचा पाणीपुरवठय़ांचा खर्च हा पाणीपट्टीच्या वसुलीतून पुर्ण होऊ शकतो. अन्यथा, पाणीपुरवठय़ासाठी महापालिकेला कर्ज घ्यावे लागेल.

मनपाला उभाराव्या लागणार भविष्यासाठी अत्याधुनिक जलवाहिन्या
जलवाहिन्या 30 ते 35 वर्षे जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे रोजचा पाणीपुरवठा शक्य नाही. रोज पाणीपुरवठा केल्यास या जलवाहिन्या फुटण्याची भीती आहे. या जलवाहिन्यांच्या नूतनीकरणासाठी 16 कोटी रुपयांची गरज आहे. यातून काही नवे जलकुंभ उभारता येतील.
-दीपक चौधरी, आयुक्त महानगरपालिका.

पाणीपट्टीत नियमित वाढ आवश्यक
शहरात केवळ 40 टक्के घरांतून पाणीपट्टी वसुली करण्यात येते. त्यामुळे महापालिकेला यासाठी तिजोरीतून खर्च करावा लागतो. शहरातील अनेक व्यावसायिक हे घरगुती पाणीपट्टी अदा करतात.

पंधरा अभियंत्यांची गरज असून, तूर्तास दहा अभियंते काम करत आहे. तब्बल 110 व्हॉल्वमन शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करतात. एकदा त्यांनी व्हॉल्व खुला केल्यानंतर तो बंद करण्यासाठी ते कामावर आहे. महान येथील शुद्धीकरण प्रकल्पावर जवळपास 34 कर्मचारी काम करत आहेत. या सर्व 178 कर्मचार्‍यांचे वेतन व इतर खर्चावर सुमारे चार कोटी रुपये खर्च होतो. 13 जलकुंभातून पाणीपुरवठा होत असला तरी, अजून चार जलकुंभांची गरज आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी शहरात पाचशे किलोमीटर लांबीची पाइपलाइन आहे. जुन्या पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जाते. जलकुंभांची स्वच्छता व डागडुजी करण्यात आली नाही.

कापशी तलावातून जुने शहरात पाणीपुरवठा होत होता. सायफन पद्धतीने कापशी येथून शुद्ध झालेले पाणी इलेक्ट्रिक पंपाचा वापर न करता येते. येथील जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्याने पाणीपुरवठा बंद आहे. तिथे असलेल्या दोन दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर नियमित केल्यास वीज बिलाची मोठी बचत होऊ शकते. अकोल्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या काटेपूर्णाचे महापालिका पाणी आणते. पण, केवळ 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या कापशी तलावाबाबत प्रशासन उदासीन आहे. शासनाने पाणीपुरवठा योजना जीवन प्राधिकरणकडे हस्तांतरित करण्याचा आदेश दिला अद्याप ती हस्तांतरित झाली नाही.