आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Municipal Corporation,Latest News In Divya Marathi

आयुक्त सोमवारी येणार, प्रभार उपायुक्तांकडेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- सुटीवर असलेले महापालिका आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर हे सोमवार, 4 ऑगस्ट रोजी रुजू होतील, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यानच्या काळात महापालिका उपायुक्त म्हणून दयानंद चिंचोलीकर यांच्याकडे आयुक्तपदाचा कार्यभार राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्य शासनाने त्यांच्याकडे आजपर्यंत प्रभार दिला होता. आयुक्तांची वाढवलेली सुटी पाहता प्रभारही वाढवण्यात येईल. दरम्यान, शहरात उपायुक्त राबवत असलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेस नागरिकांनी पाठिंबा दिला असून, शहरातील रस्ते रुंद झाल्याची भावना सर्वांची आहे. जठारपेठ वगळता महापालिकेने इतर ठिकाणचे अतिक्रमण काढावे, अशी मागणी पुढे येत असून, ती राबवण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे. बाजारपेठेतील अतिक्रमण मोहीम राबवल्यास नागरिकांना अधिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांद्वारे व्यक्त केली जात आहे.
उपायुक्तांच्या प्रभात फेरीचा धसका
उपायुक्त दयानंद चिंचोलीकर हे सकाळी सायकलवर संपूर्ण शहरात फेरफटका मारतात. त्यामुळे या फेरफटक्याचा धसका अतिक्रमणधारकांबरोबर महापालिका कर्मचार्‍यांनी घेतला आहे. ज्या भागात साफसफाई होत नव्हती तिथे आता नियमित साफसफाई होत असून, नाले सफाईची मोहीम युद्धस्तरावर हाती घेण्यात आली आहे.
नागरिकांची मूकसंमती
शहरातील रस्त्यांची वाढलेली रुंदी पाहता नागरिकांनी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेस मूकसंमती दिली आहे. याची चर्चा ठिकठिकाणी होताना दिसते. महापालिकेने केलेल्या साफसफाई अभियानाची चर्चा होत असून, तशी मोहीम मुख्य बाजारपेठेत होण्याची गरज व्यक्त केली जात आहे, तर बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांना मोठा वाव मिळेल.
युरिनल व पार्किंग आवश्यक
शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह व मुतार्‍या नाहीत. त्यामुळे महिलांची मोठी कुंचबणा बाजारपेठेत होते. ही कुंचबणा थांबवण्यासाठी केवळ महिलांसाठीचे युरिनल आवश्यक आहेत. महिलांची तशी मागणी असून, महापालिका प्रशासन व पदाधिकार्‍यांनी याविषयी तत्काळ धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. तशी सोय किमान रेल्वेस्थानक, बसस्थानक, सिटी कोतवालीजवळ, कापड मार्केट, जठारपेठ, सिंधी कॅम्प, गोरक्षणरोड, डाबकीरोड, नेकलेसरोडवर आयटीआयनजीक या मुख्य ठिकाणी आवश्यक आहे. तशीच सोय पुरुषांसाठी करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.