आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Municipal Corporation,,Latest News In Divya Marathi

उपक्रम: स्वातंत्र्य दिनानिमित्त मनपातर्फे वृक्षदिंडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिकेच्या इतिहासात प्रथमच खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा झाला. आतापर्यंत केवळ झेंडावंदन करणे म्हणजे स्वातंत्र्य दिन साजरा करणे, असे समीकरण महापालिकेत दिसत होते. मात्र, आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या कल्पनेतून महापालिकेच्या वतीने साजरा केलेला स्वातंत्र्य दिन अजरामर ठरला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त पर्यावरण जागृतीसाठी वृक्षदिंडी व प्रभात फेरीचे आयोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते.
आयुक्त डॉ. कल्याणकर रजेवरून परतल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे त्यांनी नियोजन केले. यासाठी तीन दिवस अधिकारी कर्मचारी कामाला लागले होते. एरवी झेंडा वंदन करून सहलीला जाणारे अधिकारी, कर्मचारी उत्स्फूर्तपणे महापालिकेच्या वतीने काढल्या गेलेल्या वृक्षदिंडी व प्रभात फेरीत सहभागी झाले होते. फेरीच्या प्रारंभी बँड पथक, घोडागाडी, वृक्षदिंडी, विविध 25 शाळांमधील विद्यार्थी, महापालिकेच्या मालकीची विविध प्रकारची वाहने आदी या प्रभात फेरीत सहभागी झाले होते. होलिक्रॉस व कारमेलच्या विद्यार्थ्यांनी ध्वजसंचालन केले. ज्योती जानोळकर, स्वावलंबी विद्यालय, जागृती रात्र शाळा, मनपा उर्दू शाळा क्रमांक 6, मनुताई कन्या शाळा, मुगल नॅशनल उर्दू शाळा, महापालिका हिंदी बालक शाळा क्रमांक 9, मराठी मुलांची शाळा क्रमाक 4, मनपा कन्या शाळा क्रमाक 15, उर्दू शाळा क्रमांक 3, सिंधी हिंदी शाळा क्रमांक 1, मराठी मुलांची शाळा क्रमांक 2, आर.के. शुक्ल उच्च माध्यमिक विद्यालय, भिकमचंद खंडेलवाल विद्यालय, डीएव्ही कॉन्व्हेंट, मुंगीलाल बाजोरिया आदी शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी विविध देखावे सादर केले. फेरीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी नागरिकांना पर्यावरण, स्वच्छता आदींबाबत घोषणा देऊन तसेच फलके हातात घेऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
ही फेरी महापालिका चौक, मदनलाल धिंग्रा चौक, टॉवर चौक, फतेह चौक, टिळक मार्ग आदी मार्गाने फिरली. विशेष म्हणजे एलबीटी विभागातील 50 कर्मचार्‍यांनी पर्यावरणाचा संदेश देणारे पिवळ्या रंगाचे टी शर्ट स्वत: खरेदी केले. एलबीटी कर्मचार्‍यांचे मोटारसायकल पथक या फेरीचे आर्कषण ठरले होते, तर घोडागाडी जिजाऊ, चंद्रशेखर आझाद, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग आदी क्रांतिकारकांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारली होती. फेरीत सहभागी झालेल्यांसाठी ठिकठिकाणी पाण्याची, तर महापालिकेच्या वतीने अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती. या फेरीत आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, महापौर ज्योत्स्ना गवई, उपमहापौर रफिक सिद्दीकी, विरोधी पक्षनेते हरीश आलिमचंदानी आदींच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवण्यात आली.