आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marath, Akola Municipal Corporation

मनपातील लोकप्रतिनिधींचे ‘कर लो रिलायन्स मुठ्ठी मे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - काँग्रेस व भाजपला खिशात घालण्याच्या आरोपांचा खुलासा करण्यात रिलायन्स व्यस्त आहे. असे असताना येथे अकोल्यातील पुढारी मात्र स्वत:च रिलायन्सच्या खिशात जाण्यासाठी धडपडत आहेत. जीओ रिलायन्स फोर जी केबलमधून मलिदा मिळवण्यासाठी तसा ठराव करण्यासाठी ही धडपड आहे. दरम्यान, मनपातील राजकीय नेते रिलायन्सच्या दावणीला बांधले जात असताना मनपा अधिकार्‍यांची काय भूमिका आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी याची माहिती आज दिली नाही. जुनाच प्रस्ताव नव्याने देण्यात येणार आहे. टावर संदर्भातील अहवाल तयार नसल्याने त्याविषयीचा निर्णय प्रलंबित राहिल.


रिलायन्सच्या जाळ्यात ‘महासभा’ : रिलायन्स कंपनीचे मालक अनिल अंबानी देश चालवत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्याचप्रमाणे रिलायन्स अकोल्यातील महाआघाडी व विरोधातील भाजपला चालवत आहे, अशी माहिती मिळाली. सत्तारूढ महाआघाडीबरोबर भाजपच्या नेत्यांच्या गोपनीय बैठकीने हा प्रकार उघडकीस आला. मनपाची महासभा फोर जी कनेक्शनच्या जाळ्यात फसली असून, इतर विषय गौण झाल्याची चर्चा आज मनपात होती. आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेत बुधवारच्या महासभेची तयारी सुरू केली, दिवसभर याविषयी जोरदार खलबते झाली.


सत्तारूढ व विरोधक एकत्र : सिव्हिल लाइन रोडवर सुनील मेर्शाम यांच्या प्रेसिडेन्ट हॉटेलवर सत्तारूढ भारिप-बमसंचे समन्वयक प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, महापौर पती गौतम गवई, भारिप-बमसंचे गटनेते गजानन गवई, तर भाजपचे शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, धनंजय गिरीधर, शिवसेनेचे राजेश मिर्शा यांची मंगळवार रात्री 8 वाजता बैठक झाली. पण, या बैठकीत काय झाले, याचा तपशील हाती आला नाही, तर अशाच बैठकी हॉटेल कुंजबिहारी व सुविधा येथे करण्यात आल्या.


नमो व रागा कोणाच्या खिशात : अकोल्यातदेखील रिलायन्सचे केबल टाकण्यासाठी कुणाचा पुढाकार आहे, अशी चर्चा रंगली आहे. रिलायन्स केबल टाकण्यासाठी भाजपमधील विजयी वसंत कोण व सत्तारूढ महाआघाडीत कोणी धैर्याने तोंड दिले, असा मुद्दा उपस्थित होत आहे.


आयुक्तांची भूमिका निर्णायक : आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांची भूमिका बुधवारच्या सभेत महत्त्वाची ठरणार आहे. ते मनपाच्या हिताचा निर्णय घेतात की पदाधिकारी, नगरसेवकांपुढे नतमस्तक होतात, याकडे लक्ष लागले आहे. रिलायन्सला फोर जी केबल टाकण्याबाबत त्यांची काय भूमिका राहील, यावर मनपाचे राजकारण आणि प्रशासनाची भूमिका पुढील काळात निश्चित होईल.


काय आहे फोर जी : फोर जी म्हणजे, ‘फोर्थ जनरेशन मोबाइल फोन’ असा त्याचा अर्थ आहे. मोबाइल कम्युनिकेशनमध्ये याआधारे इंटरनेट वापरासाठी अल्ट्रा ब्रॉडबॅडचा वापर करता येईल. केबलचा वापर न करता हायस्पीड ब्रॉडबॅडचा वापर करता येईल. याआधारे मोबाइलवर इंटरनेट कनेक्शनद्वारे वेबसाइट पाहता येतील, हाय डेफिनेशन मोबाइल टीव्ही पाहता येईल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, थ्री टेलिव्हिजन मोबाइलवर पाहता येईल.
पुंडकरांची घरी दोन तास बैठक : भारिप-बमसंचे मनपा समन्वयक धैर्यवर्धन पुंडकर यांच्या घरी फोर जी प्रकरणात दोन तास बैठक चालली. त्यात उपमहापौर रफिक सिद्दीकी, अनहलक कुरेशी, अब्दुल मुनाफ, बेनी शेख गंगा बेनीवाले, महापौर पती गौतम गवई व भारिप-बमसंचे गटनेते गजानन गवई यांच्यात बैठक झाली. दुपारी 4 ते 6 व रात्री 9 ते 11 या वेळेत चर्चा झाली.


विजय अग्रवाल सोडून सर्वांच्या स्वाक्षर्‍या : मनपात विरोधात असलेल्या महानगर सुधार समितीने बुधवार 26 फेब्रुवारीची सभा रद्द करण्याची मागणी महापौरांकडे केली. या सभेतील 21 विषयांची प्रशासकीय टिप्पणी मिळाली नाही. त्यामुळे ही सभा रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. महानगर सुधार समितीने पाठवलेल्या सहय़ांच्या यादीत 26 नावे आहेत. पण, सहय़ा 25 आहेत. त्यात भाजप व इतर पक्षांचे नगरसेवक आहेत. भाजपमध्ये गेलेले संजय बडोणे, माधुरी बडोणे व सुनीता विजय अग्रवाल यांची सही आहे. पण, भाजपमध्ये गेलेल्यांमध्ये समावेश असलेले व पक्षाच्या प्रदेश स्तरावर विशेष निमंत्रित या पदावर गेलेले विजय अग्रवाल यांची मात्र सही नाही. त्यामुळे पक्षात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.