अकोला - सोळाव्या लोकसभा निवडणुकीकरिता गुरुवारी मतदान होणार होणार आहे. जिल्ह्यात एकूण 21 संवेदनशील आणि 22 अतिसंवेदनशील मतदान केंद्रे असून, ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी तीन हजार 259 पोलिस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आलेत. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर विशेष पोलिस बंदोबस्त राहणार आहे.
मतदानादरम्यान काही ठिकाणी मतदारांना दमदाटी केली जावून त्यांच्यावर दबाव वाढवला जातो. शिवाय भिन्न पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन शांतता भंग होते. यासह काही ठिकाणी राजकीय कार्यकर्ते, उमेदवार यांच्याकडून मतदारांना पैशाचाही वाटप होऊ शकतो. या सगळ्या प्रकाराला आळा बसावा आणि ही निवडणूक निकोप, निष्पक्ष आणि शांततेच्या मार्गाने पार पडावी, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. बुधवारी सकाळीच जिल्ह्यातील एक हजार 774 मतदान केंद्रांवर पोलिस कर्मचारी पोचले. एका केंद्रावर तीन ते चार पोलिस कर्मचारी तैनात राहणार आहेत.
या शिवाय कुठे जर अनुचित प्रकार घडला तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने अतिरिक्त कुमूक तिथे पाठवता यावी म्हणून 80 विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी दंगा नियंत्रण आणि शिघ्र पोलिस प्रतिसाद पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. संवेदशनशील मतदान केंद्रावर पाच ते दहा कर्मचार्यांची नियुक्ती केली गेली आहे. अतीसंवेदनशील मतदान केंद्रावर दहा ते पंधरा कर्मचारी राहणार आहेत.