आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Acient Shiv Temple In Maharashtra

देशातील पुरातन शिवमंदिरांच्या भटकंतीचा भागवतांना छंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - पुरातन आणि अतिदुर्गम शिवमंदिरांना भेटी देऊन त्यांची माहिती मिळवण्याचा छंद येथील शरद भागवत यांनी जोपासला आहे. युथ होस्टेल असोसिएशनशी जुळलेले असल्याने भटकंती अंगातच भिनली असून, त्यातल्या त्यात प्राचीन महादेव मंदिरे त्यांना साद घालतात. बारा ज्योतिर्लिंगांसह देशातील अनेकविध शिवमंदिरांना भेटी देणार्‍या शरद भागवतांचा प्रवास महाशिवरात्रीनिमित्ताने खास शिवभक्तांसाठी..


भारतीय स्टेट बँकेत कार्यरत शरद भागवत युथ होस्टेल असोसिएशनच्या अकोला युनिटचे उपाध्यक्ष असून, राष्ट्रीय हिमालयीन पदभ्रमण मोहिमेचे क्षेत्र संचालक आहेत. त्यांना भटकंतीसोबतच प्राचीन शिवमंदिरांच्या अभ्यासाचा छंद आहे. ते ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाले, की मी 12 ज्योतिर्लिंग, चारही धामचा प्रवास केला आहे. यासोबत हिमालयात बरीच भटकंती केली आहे. अकोला जिल्हय़ातील धारगड शिवमंदिराला माझी दरवर्षी भेट असतेच. मात्र, आपल्याच जिल्हय़ातील कपिलमुनींचे जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणार्‍या कपिलेश्वराची फार कमी लोकांना माहिती आहे. या ठिकाणी शिवलिंगावर एक धार सतत पडत होती, मात्र कालांतराने ती बंद झाली. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तीन फूट उंचीचे दोन नंदी आहेत. मंदिराचे बांधकाम मोगलकालीन असावे, कारण मंदिराला आठ मिनार आहेत. महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते. येथे मोठा लाकडी रथ असून, त्यातून मिरवणूक निघते. सोनाळा येथून 17 किलोमीटर मोटारसायकलने गेल्यानंतर अंबाबरवा अभयारण्याचे माहिती केंद्र आहे. येथून दोन तासांची खडी चढाई करून येथे मंदिरात पोहोचता येते. चढाई करताना दिसणारे मंदिराचे झेंडे थोडी चढाई केल्यानंतर दिसत नाहीत. या ठिकाणी दगडाची भली मोठी कडा कोरून मंदिराची निर्मिती केली आहे. आतमध्ये पाण्याचे टाके आहे. तेथे शिवलिंग व गणेश मूर्ती आहे. हा मांगेरी महादेव होय. कवठा सोपीनाथ, मळसूरचा सोपीनाथ, पातूर तालुक्यातील इसवीचा महादेव, अंत्रीचे स्वयंभू शिवमंदिर, वाशिम जिल्हय़ातील डाकेतला महादेव, देवरीचा महादेव, सिंदखेडचा मोरेश्वर ही मंदिरे शिवभक्तांनी नक्कीच पाहावीत, अशी आहेत, असेही ते म्हणाले.


वडाच्या पारंब्यांनी झाकले मंदिर : बुलडाणा जिल्हय़ातील जटाशंकरही प्रसिद्ध शिवतीर्थ आहे. टुणकी बावनबिर येथून हड्या महलपर्यंत वाहनाने जाता येते. तेथून एक ते दीड किलोमीटर पायी गेल्यानंतर जटाशंकर मंदिर येते. या मंदिराला दार नसून, वडाच्या पारंब्यांनी मंदिर झाकले आहे. या पारंब्या बाजूला सारून वरून कोसळणार्‍या धारेतून शिवलिंगाचे दर्शन घडते. डिसेंबर ते जानेवारीपर्यंत ही धार वाहते. बुलडाणा जिल्हय़ातीलच मांगेरी महादेव माझ्या कायम स्मरणात राहतो.