आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Akola Municipal Corporation

अकोला मनपात अनियमिततेची कोटीच्या कोटी उड्डाणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महापालिकेचा 2011-12 या वर्षातील लेखापरीक्षण अहवाल उघड झाला आहे. या अहवालात काही कोटी रुपयांची अनियमितता झाल्याचे औरंगाबाद येथील स्थानिक निधी लेखा यांनी निदर्शनास आणले आहे. ही अनियमितता काही कोटी रुपयांची असून, महापालिकेतील गैरप्रकार रोखण्यास प्रशासनाने दुर्लक्ष केले, असा ठपका यात ठेवलेला आहे. या सर्व अनियमिततेत दोषींवर कारवाई करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे.


महापालिकेची वसुली आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत होत नाही. शेवटच्या चार महिन्यांत ती करण्यात येते. महसुली जमा शिल्लक अंदाजपत्रकात जमा केल्याने महसुली जमा 16 कोटींनी फुगवली होती. महिला व बालकल्याण कार्यक्रमासाठी 5 टक्के रक्कम खर्च करण्याची गरज होती. पण, तसे झाले नाही. आर्थिक दुर्बल घटकांवर खर्च केला नाही. घसारा निधी जमा राशी यात गेल्या तीन वर्षांपासून निधीची तरतूद केली नाही.
सन 2011-12 च्या अर्थसंकल्पात तरतूद नसताना 3 कोटी 27 लाखांचा खर्च 10 विविध विभागांवर केला, तर 45 विविध बाबींवर 8 कोटी 13 लाख जास्त खर्च केले. अपंग कल्याणाच्या निधीची तरतूद केली. पण, खर्च केला नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व महिला व बालविकासाच्या धोरणास अत्यंत उदासीन धोरण असल्याचे नमूद केले आहे. आस्थापना खर्च 35 टक्के असणे गरजेचे असताना तो 64 टक्क्यांवर गेला आहे. हा खर्च सुमारे 36 कोटींवर गेला आहे, तर महापालिकेचे दायित्व 458 कोटी, तर मत्ता 66 कोटी इतकी झाली आहे. सन 2003 पासून मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन झाले नसल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. महापालिकेला आर्थिक उत्पन्नापासून वंचित ठेवणार्‍यांची प्रशासकीय जबाबदारी आज पर्यंत निश्चित झालेली नाही. 61 प्रकरणांत 3 कोटी 65 लाख वसूल पात्र, तर 18 कोटी 82 लाख आक्षेपाधीन रक्कम आहे, अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे. महापालिकेत 101 प्रकरणांत 21 लाख 18 हजार रुपये मंजुरीशिवाय अधिकार्‍यांच्या वाहन भाड्यावर खर्च केले. दलित वस्ती सुधार योजना, दलितोत्तर निधी व इतर निधी प्रकरणात एकूण 266 ठिकाणी 8 कोटी 63 लाखांचे अभिलेख उपलब्ध झाले नाहीत.
महापालिकेने 754 प्रकरणांत एक टक्के कामगार उपकराची वसुलीच केली नाही, तर 83 कर्मचार्‍यांनी घेतलेली 39 लाखांची अग्रीम थकित आहे.