आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Akola Municipal Corporation Politics

खोदकाम रिलायन्सचे; पडझड महापालिकेतील आघाडीमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - रिलायन्स कंपनीला खोदकामाची परवानगी देण्याच्या नादात महापालिकेतील सत्तारूढ महाआघाडीतच आज पडझड झाली. या पडझडीनंतर नवनियुक्त आयुक्तांनी गडबड गोंधळात झालेला कुठलाही ठराव मंजूर नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे सत्तारूढ भारिप-बमसं व काँग्रेसच्या काही नगरसेवकांना चपराक बसली. या घडामोडीत विरोधातील भाजप, शिवसेना आणि काही अपक्षांचे मनोधैर्य उंचावले.


गणपूर्तीअभावी महासभा स्थगित झाल्यानंतर सभेच्या पुढील कामकाजात कुठलाही ठराव पारित झाला नाही, अशी कडक भूमिका आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी घेतली. त्यांनी ही भूमिका सभा संपल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. महापालिकेत महासभेत गोंधळ झाला आणि या गोंधळातच काही विषय मंजूर करण्याचा प्रयत्न भारिप व काँग्रेसच्या सदस्यांनी केला. पण, विरोधकांचा विरोध, सत्तापक्षातील फूट पाहता महापौर ज्योत्स्ना गवई यांनी राष्ट्रगीताचा आधार घेत सभा गुंडाळली. महापालिकेत आज महासभा होती. गेल्या अनेक महिन्यांपासून महासभा न झाल्याने व आयुक्त रुजू झाल्याने या सभेकडे शहराचे लक्ष होते. या महासभेत रिलायन्स कंपनीला 4-जीसाठी भूमिगत केबल टाकण्याची परवानगी देण्याचा मुद्दा होता. या मुद्दय़ावरून सत्ता पक्षात तीव्र मतभेद निर्माण झाले होते. सकाळी 11.30 वाजता सभा सुरू झाली तेव्हा सभेत केवळ महापौर, उपमहापौर, आयुक्त, भारिप-बमसंचे सदस्य, ज्येष्ठ नगरसेवक सुनील मेर्शाम, भाजप नगरसेवक प्रतुल हातवळणे यांची उपस्थिती होती. या सभेत गणपूर्ती नसल्याची माहिती नगरसचिव वासुदेव वाघाळकर यांनी दिली. त्यामुळे ही सभा तहकूब करण्याचा निर्णय महापौर ज्योत्स्ना गवई यांनी घेतला. सभा किती वेळासाठी तहकूब करायची आहे, यावर सुनील मेर्शाम, प्रतुल हातवळणे यांचा भारिप-बमसं गटनेते गजानन गवई यांच्याशी वाद झाला. पण, मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमानुसार गणपूर्तीअभावी सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला व दुपारी 1.30 वाजता सभा बोलवली.
या सर्व प्रकारामुळे सत्तारूढ महाआघाडीतील फूट उघड झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अकोला विकास आघाडी पक्षातील अनेक नगरसेवकांचा सत्तेला असलेला पाठिंबा नसल्याचे चित्र होते. सत्तेच्या विरोधात गेलेल्या नगरसेवकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर खुच्र्या टाकत बसणे पसंत केले. सभा तहकूब झालेल्या कालावधीत विरोधकांनी मोर्चे बांधणी करत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या फुटलेल्या नगरसेवकांना जोडण्याचा प्रयत्न केला, त्यात ते यशस्वी झाले. काँग्रेसमध्ये फूट पडल्याने पक्षाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता होती. काँग्रेसचे उपमहापौर रफिक सिद्दीकी, साजीद खान आदींनी सत्तारूढ भारिप-बमसंला धीर दिला, पण त्याचा फायदा झाला नाही.
तहकूब सभा 1.30 वाजता सुरू झाल्यानंतर भारिप-बमसं नगरसेवक रामा तायडे यांनी प्रभागातील समस्या मांडली. त्यानंतर विरोधी पक्षनेते हरीश आलिमचंदानी यांनी महासभेतील विषय पत्रिकेतील विषयांची टिप्पणी मिळाली नसल्याने सभा रद्द करावी, अशी मागणी केली. महापालिकेत नगरसचिवांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन करण्याची प्रथा आहे.


त्यानंतर चर्चा करत आवश्यक तेव्हा मतदान घेत विषय मंजूर केले जातात. पण, विरोधी पक्षनेत्यांच्या भाषणानंतर भारिप-बमसं गटनेते गजानन गवई यांनी विषय पत्रिकेवरील चार ते सहा विषय वाचून काढले. यात घनकचरा टनानुसार, रिलायन्स कंपनीला 4-जी केबल टाकण्याबाबत परवानगी आदी विषयांचा समावेश होता. हा प्रकार सुरू असताना विरोधकांनी यावर चर्चा करा व मतदान घ्या, अशी मागणी केली.


या विषयांना काँग्रेसचे साजीद खान यांनी पाठिंबा दिला व हे विषय मंजूर झाल्याची घोषणा महापौर ज्योत्स्ना गवई यांनी केली. अशाप्रकारे मनमानी पद्धतीने विषय मंजूर करता येणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. यानंतर गोंधळ होत असताना विरोधकांनी आयुक्तांकडे दाद मागितली. दोन पोलिस अधिकार्‍यांनी सभेत पाचारण केले व ते नंतर निघून गेले. महापौरांनी या गोंधळात नगर सचिवांना राष्ट्रगीत म्हणण्याचा आदेश दिला व राष्ट्रगीताने सभा संपली. राष्ट्रगीत सुरू होते तेव्हा सभेत गोंधळाची स्थिती होती. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त महापालिकेत होता.


स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीचा विसर
सभेच्या निर्धारित वेळेत सभा सुरू व्हावी, अशी अपेक्षा आयुक्तांना होती. निर्धारित वेळेनंतर वीस मिनिटांत सभा सुरू झाली तर ठीक, नाही तर सभा सोडण्याचा इशारा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिला. तसे त्यांनी अधिकार्‍यांना सूचित केले. त्यांच्या या इशार्‍यानंतर सकाळी 11.30 वाजता सभा सुरू झाली.