आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Akola Municipal Corporation Removed Hordings Board

मनपाने कोर्टाच्या आदेशावर शहरातील होर्डिंग्ज काढले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने शुक्रवार, 28 फेब्रुवारी रोजी शहरातील विविध रस्त्यांवरील सार्वजनिक ठिकाणचे अनधिकृतरीत्या लावलेले होर्डिंग्ज, बॅनर्स काढलेत.महापालिका आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिलेल्या आदेशांवरून शहरात शुक्रवारी अतिक्रमण हटावची धडक मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, अशोक वाटिका, मध्यवर्ती बसस्थानक, सिव्हिल लाइन रोड, सिव्हिल लाइन ते नेहरू पार्क, नेहरू पार्क ते अशोक वाटिका रोडवरील अतिक्रमण हटवले. दरम्यान, 10 बाय 20 चे मोठे होर्डिंग्ज 20, छोटे होर्डिंग्ज, बॅनर्स काढले. मनपाच्या कर्मचार्‍यांनी केलेल्या कारवाईमध्ये काही राजकीय फलकांचासुद्धा समावेश होता. दरम्यान, संबंधित राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कारवाईस अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या कारवाईत अतिक्रमण विभागप्रमुख विष्णू डोंगरे, प्रवीण मिर्शा, विजय बाहोळे, संजय थोरात, दिनेश गोपनारायण, सुरक्षा रक्षक विनोद वानखडे, रूपेश इंगळे, मधुकर कांबळे आदींनी सहभाग घेतला.


मोहिमेदरम्यान ‘पोलिस’ गायब
शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याबाबत न्यायालयाने प्रशासनाला आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि महापालिका आयुक्तांनी संयुक्तपणे कारवाई करणे अपेक्षित आहे, असे असतानाही कारवाईदरम्यान एकही पोलिस कर्मचारी अतिक्रमण हटाव विभागाच्या मदतीला धावून आला नाही. त्यामुळे कारवाईविषयी पोलिसांना कळवले नाही की पोलिसांनी कारवाईत सहभागी होण्यास नकार दिला, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.


‘दादां’कडून मज्जाव
अतिक्रमण हटाव मोहीम राबवत असताना सिव्हिल लाइन व पोस्ट ऑफिस चौकात एका राजकीय पक्षाचे बॅनर्स हटवत असताना ‘दादा’ने दादागिरी करत कारवाई करण्यास मज्जाव केला. मात्र, पथकप्रमुख विष्णू डोंगरे यांनी कशाचाही तमा न बाळगता ही कारवाई केली.

पोलिसांना दिली सूचना
शहरामध्ये शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत असून, कारवाईस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक कार्यालयाला पत्राद्वारे मदत मागितली होती, असे अतिक्रमण हटाव विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगिंतले. मात्र सूचना देऊनही पोलिस येत नाही, त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत साशंकता निर्माण झाल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.