आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद समिती सदस्य निवडीचा मतदानाने सुटला तिढा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - येथील जिल्हा परिषदेच्या विविध विषय समितींच्या निवडीची प्रक्रिया मंगळवार, 25 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजेपर्यंत सुरू होती. स्थायी समिती, बांधकाम आणि समाजकल्याण समिती सदस्यांकरिता अखेर मतदान घेतल्यानंतर हा तिढा सुटला. दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत सात तास ही प्रक्रिया चालली.


जिल्हा परिषदेत विविध प्रकारच्या दहा विषय समिती असतात. विकासकाम करण्याच्या दृष्टिकोनातून या समितींचे कार्य महत्त्वाचे असते. या समितींच्या सभापतींची निवड 28 जानेवारी रोजीच झाली आहे. या समितींमध्ये सदस्य म्हणून निवड होणेही जिल्हा परिषद सदस्यांच्या दृष्टीने वजनाची बाब समजली जाते. त्यामुळे दहापैकी एकातरी समितीत सदस्य म्हणून आपले नाव असावे, असा आग्रह प्रत्येक सदस्याचा असतो. यासाठी प्रत्येकाने गेल्या पंधरा दिवसांपासून अध्यक्षांकडे साकडे घालायला सुरुवात केली होती. यापूर्वी जिल्हा परिषदेची सभा 15 फेब्रुवारी रोजी तहकूब केली होती. त्यानंतर ही सभा आज, 25 फेब्रुवारीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात दुपारी 1 वाजता आयोजित केली. या सभेला अध्यक्ष शरद गवई यांनी उशीर केल्याने सभा 3 वाजता सुरू झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या भारिप-बमसंच्या सदस्यांव्यतिरिक्त शिवसेना, काँग्रेसच्या सदस्यांनी नाराजीचा सूर काढला होता. या सभेला अध्यक्ष शरद गवई, उपाध्यक्ष गुलाम हुसेन गुलाम नबी देशमुख, आरोग्य सभापती राधिका पाटील, समाजकल्याण सभापती गोदावरी जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती द्रौपदाबाई वाहोकार यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, समिती सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा परिषद सदस्य नितीन टाले यांनी सभेचे सचिव जावेद इनामदार यांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. 14 फेब्रुवारी रोजी विषय समितींची निवड करण्याबाबत प्रशासनाला पत्र दिले. त्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी स्मरण पत्र दिले. तरीसुद्धा याबाबत कार्यवाही न करता आज, 25 फेब्रुवारी रोजी हातात यादी दिली जात आहे. या प्रकाराबाबत त्यांनी रोष व्यक्त केला. सभागृहाने सचिवावर कारवाई करावी, अशी मागणी करत त्यांनी सभात्याग केला.


सात समितीच्या सदस्यांची निवड बिनविरोध : पशुसंवर्धन, शिक्षण, वित्त, जलव्यवस्थापन, कृषी, महिला व बालकल्याण, आरोग्य या सात समितींमध्ये सदस्यांची निवड बिनविरोध झाली.
स्थायी, बांधकाम आणि समाजकल्याणसाठी मतदान : सात समितींची निवड बिनविरोध करणार्‍या सदस्यांनी मात्र स्थायी, बांधकाम आणि समाजकल्याण समिती सदस्यासाठी आग्रह धरत अनेक सदस्य बसले होते. त्यामुळे मतदान प्रक्रिया रात्री 10.15 वाजेपर्यंत सुरू होती.
हे आहेत सदस्य : 1, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय समिती : गजानन गावंडे, माया कावरे, संजय आष्टीकर, जमीर खान पठाण, लीला गावंडे, रेणू चव्हाण, संजय लोखंडे, निरंजन सिरसाठ. 2, शिक्षण व क्रीडा समिती : रेहनाबी, अक्षय लहाने, देवानंद गणोरकर, अनिता आखरे, शबाना खातून, ज्योत्स्ना चोरे, संतोष वाकोडे, गोपाल कोल्हे. 3, वित्त समिती : अक्षय लहाने, देवानंद गणोरकर, सुनील जाजू, ज्योत्स्ना बहाळे, गंगूबाई धामोळे, गीता राठोड, रेणुका दातकर. 4, जलव्यवस्थापन समिती : माधुरी गावंडे, अनिता आखरे, गोपाल कोल्हे, सरला मेर्शाम, गजानन गावंडे, राजेश खोडे. 5, कृषी समिती : मंजूषा लंगोटे, डॉ. हिंमतराव घाटोळ, प्रतिभा अवचार, रमन जैन, माधुरी गावंडे, शबाना खातून, देवकाबाई पातोंडे, विलास इंगळे, रेणुका दातकर, रेखा अंभोरे, माधुरी कपले. 6, महिला व बाल विकास समिती : रेहनाबी आलमगीर, माया कावरे, ज्योत्स्ना बहाळे, संध्या वाघोळे, रेणू चव्हाण, रमिजाबी शेख साबीर, मंजूषा वडदकर, माधुरी कपले. 7, आरोग्य समिती : नितीन टाले, मंजूषा वडदकर, गीता राठोड, रवींद्र गोपकर, संध्या वाघोळे, दीपक अढाऊ, शुभांगी खंडारे, रमण जैन आदींचा समावेश आहे.