आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटोरिक्षा परवान्यांची यादी आज होणार प्रकाशित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - 19 वर्षांनंतर नवीन ऑटोरिक्षा परवाना देण्याची प्रक्रिया राबवली. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले होते. ऑनलाइन पद्धतीने परवान्यांची सोडत आज, 26 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात काढली असून, गुरुवार, 27 फेब्रुवारीला संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयांतून 740 ऑटोरिक्षा परवान्यांचे वाटप होणार आहे.


ऑटोरिक्षा परवाना वितरणाची प्रक्रिया शासनाने बंद केली होती. परंतु, शासनाने ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली. त्यामुळे ऑटोरिक्षाचालकांना परवान्याची संधी उपलब्ध झाली. परवान्यासाठी महाऑनलाइन या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज मागितले होते. सरकारची संग्राम केंद्र आणि सायबर कॅफेंमध्येही अर्ज भरून देण्याची सोय केली होती. त्यासाठी शंभर रुपये शुल्क आकारले. 15 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले. ऑटोरिक्षा परवान्यांची लॉटरी सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काढली. निकाल उद्या, 27 फेब्रुवारीला संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. शहरातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून सुरुवातीला 369 परवान्यांचे वाटप होणार होते. शासनाच्या नवीन नियमानुसार आता अकोल्यातून 740 परवान्यांचे वाटप होणार आहे.


नियमांचा ठरला अडथळा
ऑटोरिक्षा परवान्यासाठी विविध अटी व नियम लागू होते. अनेकांसाठी हे नियम व अटीच अडथळा ठरले. नियम व अटी पूर्ण न करणार्‍यांचे अर्ज बाद झाले. ऑटोरिक्षाला इलेक्ट्रॉनिक मीटर आवश्यक, ऑटोरिक्षा नवीन किंवा 5 वर्षांपर्यंत जुनी असलेल्या ऑटोरिक्षाचालकांनाच हे परवाने, अर्जदाराकडे ऑटोरिक्षाचे वाहन, चालक अनुज्ञप्ती तसेच सार्वजनिक सेवा वाहनाचा बॅच असणे गरजेचे, अर्जदारास मराठी भाषेचे व स्थानिक क्षेत्राचे ज्ञान आवश्यक आदींसह अनेक नियम लागू होते. नियम, अटी व शर्तींमुळे अनेक इच्छुक ऑनलाइन अर्ज करण्यातून बाद झाले.

गैरप्रकारांना आळा : परवाना वाटप करण्यासाठी संगणकीकृत पद्धतीनेच सोडत काढल्याने यामध्ये गैरप्रकारांना आळा बसला. परवाना वाटप करताना पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न राज्य शासनातर्फे केला. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात आली. त्यामुळे या प्रक्रियेदरम्यान कुठेही गैरव्यवहार होऊ शकले नाहीत.