अकोला - सिंधी कॅम्पमधील पक्की खोली येथे राहत असलेल्या कौशल्याबाई वभलानी यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या कौशल्याबाई यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अटकेत असलेल्या पतीस शनिवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयाने सोमवार 17 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, तर अन्य दोन आरोपी फरार आहेत.
कौशल्याबाई कृपालदास वलभानी या सिंधी कॅम्प येथील पक्की खोलीमध्ये त्यांच्या 14 वर्षीय मुलीसोबत राहत होत्या. तिचा पती कृपालदास वभलानी हा दीड वर्षापासून वेगळा राहतो. तो त्यांना घर खाली करण्याच्या कारणावरून त्रास देत होता. कौशल्याबाई त्यांच्या उदरनिर्वाहासाठी कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय करत होत्या. पत्नीच्या छळासंदर्भात कृपालदास याच्यावर यापूर्वी पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल केले आहेत. शनिवारी कौशल्याबाई सिंधी कॅम्प चर्च जवळून जात असताना एका दुचाकीवरून तिघे जण आले. त्यांनी त्यांच्या डोक्यावर लोखंडी पाइपने हल्ला के ला. यातील एक जण वडीलच आहे, अशी माहिती आरोपीच्या मुलीने दिल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शुक्रवारी रात्री कृपालदास यास ताब्यात घेतले होते, तर अन्य दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणात आरोपी कृपालदासला शनिवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.